इंदूर- भय्यू महाराजांना धमकावणे आणि ब्लॅकमेल करण्याचा आरोप असलेल्या तरुणीचा रविवारी पोलिसांनी जबाब नोंदवला. सीएसपी आझादनगरच्या कार्यालयात पोलिसांनी 10 तास या तरुणीची चौकशी केली. या वेळी सेवेकरी विनायक दुधाळे व शेखर पंडित यांचीही चौकशी करण्यात आली.
सीएसपी अगम जैन यांनी सांगितले, तरुणीने भय्यू महाराजांना धमक्या दिल्याचा इन्कार केला. तरुणीच्या मोबाइल फोनमधील डिटेल्स काढण्यात येत आहेत. चौकशीत त्या तरुणीने सांगितले, भय्यू महाराजांनी आत्महत्या करण्यामागे कौटुंबिक कलहाची पार्श्वभूमी आहे. मी त्यांना एकट्याने कधी भेटलेले नाही अथवा त्यांच्याशी फोनवर बोलणेही झालेले नाही. गुरुजींचा माझ्यावर मुलगी कुहूइतकाच विश्वास होता. ते मला कुहूप्रमाणेच वागवत असत. त्यांच्या अनेक खासगी प्रकरणात माझ्याशी सल्लामसलत करत असत. यामुळे मी त्यांच्या खूप जवळची आहे, असा लोकांमध्ये ग्रह पसरला होता.
गुरुजींना दुसऱ्या लग्नात कुहूला निमंत्रित करायचे होते. परंतु कुहू आली नव्हती. मग त्यांनी मला बोलावून घेतले. कुहूवर गुरुजींचे जेवढे प्रेम आणि जिव्हाळा होता तितकाच तो माझ्यावरही होता. यामुळे कुहूला माझ्याविषयी आकस होता. परंतु आमच्यात कधी वाद झालेला नाही. गुरुजींच्या घरातील लोकांनाही माझ्याबद्दल शंका येऊ लागली तेव्हा मी स्वत:हून फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांच्याकडील नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी मला कधी बोलावले नव्हते अथवा लग्नाचे निमंत्रणही दिले नाही. काही लोकांनी मला बदनाम करण्यासाठी 40 कोटी रुपये, फ्लॅटची मागणी यासारखे खोटे आरोप ठेवले. जर गुरुजींना ब्लॅकमेल केले असते तर सुसाइड नोटमध्ये त्यांनी काही लिहून ठेवले असते.

Post a Comment