0
पंढरपूर :

लोकसभा निवडणुकीत २०१४ सालच्या ज्या माढा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादीच्या तोंडचे पाणी पळवले होते. थोडक्या मतांनी पराभव स्वीकारूनही स्वाभिमानीने नैतिक विजय मिळवला होता. त्याच मतदारसंघात सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटना बॅक फुटवर गेली आहे. या मतदारसंघात स्वाभिमानिकडे उमेदवारच नाही. एवढेच नाहीतर इथे स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक तरी लढवणार आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. आजवर या मतदारसंघात कोणत्याही विरोधी पक्षाला विजयाच्या जवळपासही पोहोचता आलेले नाही, एवढी मोठी पकड या मतदारसंघावर राष्ट्रवादीची आहे. परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वाभिमानीने ऊस दराचे आंदोलन उभे करून आपली जागा निर्माण केली आणि नंतर भाजप आघाडीत सामील होऊन या मतदारसंघात सदाशिव खोत यांना उतरवले होते. स्वाभिमानीचे काम, सरकार विरोधी वातावरण, सदाशिव खोत यांची घणाघाती भाषणे, मोदी लाट आणि राष्ट्रवादीतील अंतर्विरोध याच्या जोरावर सदाशिव खोत यांनी राष्ट्रवादीचे मातब्बर नेते विजयसिंह मोहिते पाटील यांना जोरदार झुंज दिली. जिंकता जिंकता नाकीनऊ आणले होते. २०१४ च्या राज्यातील रोमहर्षक लढतीतील एक म्हणून माढा लोकसभेच्या निवडणूक निकालाकडे पाहिले जाते. त्यानंतर मागील ४ वर्षात मात्र चित्र पूर्णपणे पालटले असून आज या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना शोधावी लागणार आहे. संघटनेत २ वेळा फूट पडली, जिल्ह्यातील काही नेते भाजपच्या वळचणीला गेले तर काही चमको पदाधिकारी रयत सरकारी संघटनेत सामील झाले, संघटनात्मक ताकद क्षीण झाल्याने ऊस दर आंदोलनाची धग विझून गेली. या वर्षी तर ऊस दराचे आंदोलन उभाच राहिले नाही.

स्वाभिमानी भाजप आघाडीतून बाहेर पडली. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्याना सत्तेचा कसलाच लाभ मिळाला नाही. २ वर्षांपूर्वी या मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा दृष्टीने रविकांत तुपकर यांनी चाचपनी केली मात्र संघटनेचा प्रभाव उरला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि तुपकरांनी आपला मोर्चा बुलढण्याकडे वळवला आहे. आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना माढा मतदारसंघात स्वाभिमानीच्या आघाडीवर सामसूम आहे. एवढेच नाहीतर सार्वजनिक चर्चेतही स्वाभिमानीचा साधा उल्लेखही होत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता काँग्रेस आघाडीत सामील होण्याची शक्यता दिसत असल्यामुळे माढा मतदारसंघात ही जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माढा लोकसभा निवडणुकीचा नाद सोडून दिल्याचे दिसत आहे. एकंदरीत २०१४ च्या निवडणुकीत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना ४ वर्षातच या मतदारसंघात अदखलपात्र अवस्थेला पोहोचली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्याच्याही राजकीय वर्तुळात अदखलपात्र ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Post a Comment

 
Top