0
रोजचे रणांगण नसतेच सोपे. किती समस्यांना तोंड देत रोजचा दिवस जात असतो...

कॅलेंडरचं पान नाही फक्त, आज कॅलेंडरच बदललं! म्हटलं तर काहीच नाही बदललं. अव्याहत धावणारा काळ केवळ विभागणी केल्यानं थोडाच नव्या दिशेनं धावणार अथवा वळण बदलणार! पण तरीही बरेच काही बदलले. एका क्षणात भल्या-बु-याचे गाठोडे गळून पडले आणि नव्या विकल्पांसह नव्या वाटेवर पाऊल पडले. ही उमेदच तर बदलून टाकते सारे आणि जगणे होते आनंदगाणे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघे जग आज सज्ज असताना जगाचं खेडं झालं आहे आणि खेड्यात जग अवतरलं आहे. निराशा, भय आणि चिंता सामूहिक, तशीच उमेदही असते सामूहिक, संसर्गजन्य. 'कनेक्टेड' जगात तर आणखी जास्त. हीच उमेद आज सर्वदूर दिसते आहे. प्रत्येकाच्या मनात ती वस्तीला आली आहे. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री सुरू असलेल्या जल्लोषात तमाच्या तळाशी दिवे कधी लागले आणि नव्या स्वप्नांनी घरटे कधी विणले हे लक्षातही आले नाही. पण तसे घडले खरे.

रोजचे रणांगण नसतेच सोपे. किती समस्यांना तोंड देत रोजचा दिवस जात असतो... वर्तमानपत्राकडं पाहण्याची आणि टीव्ही सुरू करण्याची भीती वाटावी अशी नवी बातमी रोज दिसत असते. माहितीच्या महामारीनं तर सगळं विदारक, सगळं भयावह अगदी पुढ्यात आणून उभं केलेलं असतं. सारं कोसळेल असं वाटत असतं आणि तरीही आपण पुढं जात असतो. वाट कापत असतो. असं कोणतं बळ असतं, जे आपल्याला इंधन पुरवत असतं? ही अंगभूत उमेद तर आहे, ज्यामुळं झंकारणा-या तारा आपल्या अंतरंगात असतात. निराशा जेवढी सनातन तेवढीच उमेदही आदिम. उमेद ही फक्त मनाची अवस्था नाही, याच बळावर तर संस्कृती उभ्या राहिल्या. नवनवे शोध लागले आणि कलाविष्कारांनी मानवी जीवन श्रीमंत केलं. 'हम होंगे कामयाब' या उमेदीनं निघालेल्या मानवी समूहांना रोखणं कोणालाही शक्य झालं नाही. 'इन्किलाब जिंदाबाद'च्या ना-यांना पायदळी तुडवणं जमलं नाही. कधी ही उमेद 'आय हॅव ए ड्रीम' म्हणत आली, तर कधी 'येस, वी कॅन' असा तिचा अवतार होता. हुकूमशहांच्या टाचांखाली पिचलेल्या देशांनी मोकळा श्वास घेतला तो याच उमेदीमुळं. हीच उमेद होती म्हणून सरंजामशहांना आपली गादी सोडावी लागली, साम्राज्यविस्तार करणा-या वसाहतवादी आक्रमकांना घरची वाट धरावी लागली. पुरुषसत्ताक व्यवस्थेला पराभूत करत 'ती'ची वाट प्रशस्त होत गेली. कालपर्यंत ज्यांना आवाजच नव्हता त्यांची गर्जना आकाश व्यापून बुलंद होत गेली. मानवी इतिहास हा अशा उमेदीचा प्रवास आहे. भाषा असो वा संस्कृती, हा मुक्काम नाही, प्रवासच तर आहे. आणि हा प्रवास अद्यापही सुरू आहे. काहीच अंतिम नाही. म्हणून तर खरी मौज आहे. आज ग्रेट वाटणारे तंत्रज्ञान अगदी उद्याच सामान्य वाटावे असा हा दीर्घ पल्ल्याचा प्रवास आहे. या यात्रेतील आपण वारकरी आहोत. हातात 'बॅटन' घेत धावणा-या पिढ्या बदलतील, पण प्रवास चिरंतन आहे.

बाकी सारे बदलत जाणारे, बदल मात्र शाश्वत. या बदलाच्या लयीत चालत राहिला म्हणून तर मानवी समुदाय आज इथवर येऊन पोहोचला. संस्कृती असो अथवा भाषा, जी बदलाला भिडते, तीच रसरशीतपणे उभी राहाते. बदलाच्या या प्रक्रियेत मानवी समूह बदलाला भिडत गेला आणि या प्रक्रियेलाही अंतर्बाह्य बदलत राहिला. भारत नावाचा देश तर उभा राहू शकेल हेच अनेकांसाठी आश्चर्याचे होते. कारण तोवर देश म्हणून उभे राहण्यासाठी धर्म, भाषा असेच अधिष्ठान मूलभूत मानले जात होते. भारताने मात्र मानवी पायावर देश उभा केला. नंतर त्याच मूल्याच्या दिशेने अवघ्या जगाला जाणे भाग पडले. अर्थात, हे एका क्षणात घडले नाही. कित्येक वर्षे जावी लागली तेव्हा कुठे आजचा भारत आकाराला आला. सरत्या वर्षाकडं पाहताना निराशेचे प्रसंग कमी नाहीत, धर्माच्या नावाने जमाव कोणाला ठेचून मारतो. 'वंशाला दिवा' म्हणून मुलगाच हवा या हट्टापोटी दहा बाळंतपणं लादली गेलेली माउली रक्ताच्या थारोळ्यात पडते, जातीय वणव्यात भारताची कल्पना होरपळते... असंही पाहिलं सरत्या वर्षानं. आशेचे सगळे दोर संपल्यानंतर शेतक-याच्या गळ्याला लागलेला दोरही पाहिला सरत्या वर्षानं. ज्या संस्थांच्या भरवशावर उभा आहे हा देश, त्या सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, सीबीआय अशा संस्थांचा अवमानही पाहिला. लोकशाही आपल्या हातातून निसटते की काय, हे सामान्य माणसाचे भयही ठळक केले. 'सब से खतरनाक होता है, हमारे सपनों का मर जाना,' ही विदारकता अनुभवताना आणि उमेदीच्या नावाखाली दिसणारा खोटारडेपणा हरक्षणी पचवताना पिचूनही गेला इथला सामान्य माणूस. पण तरीही नव्या संकल्पांसह तो झेपावतच राहिला.

नव्या वर्षात पाऊल ठेवताना फक्त कॅलेंडर नवे असून चालणार नाही. आपण ख-या अर्थानं 'आधुनिक' आहोत का, हा खरा सवाल आहे. 'ट्रिपल तलाक' मोबाइलवरून दिला म्हणजे आपण नवे होत नाही. तंत्रज्ञान नवे असेल, पण ते तर केवळ वाहन आहे. ते वापरणारे आपण काय आहोत, आपल्या धारणा काय आहेत, हा खरा प्रश्न आहे.

आज नवं वर्ष येत असताना आकाश तेच असेल, पण आकाशाला गवसणी घालणारी आपली उमेद नवी असेल. तोच असेल भवताल, पण तुझा ताल वेगळा असेल. तुम्ही असाल तसेच, पण झंकारणा-या तारा असतील मनात. घर असेल तसेच, पण प्रेमाची बरसात असेल अंगणात. गाव असेल तेच, पण लोक मग्न असतील भिंती नव्हे, तर सेतू बांधण्यात. देश असेल असाच, पण भारतीयत्वाचा आशय असेल ठळक अक्षरात! येणारे वर्ष कसोटी पाहणारे आहे. आपली परीक्षा घेणारे तर आहेच, पण भारताचे नागरिक म्हणूनही आपल्याला बळ एकवटावे लागणार आहे. ही लढाई भारताच्या अस्तित्वाची आहे. आपल्या अंगणात आलेल्या या नव्या वर्षाचं स्वागत करताना, म्हणूनच तर तुमच्यासाठी ही उमेद घेऊन आम्ही उभे आहोत. तुम्ही आणि आम्ही वेगळे कुठे आहोत? परस्परांना उमेद देत हे नवं वर्ष देखणं करूया!
Divya Marathi Agralekh 1 January 2019

Post a Comment

 
Top