0
बळीराजाचा संताप - जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व कारखानदारांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण

उस्मानाबाद - जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची होत असलेली पिळवणूक, कारखानदारांकडून सभासदांचा ऊस मागे ठेवून बिगरसभासदांचा गाळप होत असलेला ऊस यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वैतागून सामूहिक उसाचे फड पेटवण्याचा कार्यक्रम गुरुवारी (दि.२४) सांजा शिवारात आयोजित केला आहे. यासाठी जिल्हाधिकारी तसेच साखर कारखानदारांनाही निमंत्रण दिल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
जिल्ह्यात सध्या नगदी पीक म्हणून उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. मागील काही वर्षात अनियमित पर्जन्यामुळे खरीप व रब्बीच्या पिकातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. अशा परिस्थिती ज्या शेतकऱ्यांकडे थोडेफार पाणी उपलब्ध होते. त्यांनी उसाची लागवड करून काहीतरी पदरात पडेल या अपेक्षेने काळजीने ऊस जोपासला. परंतु, जिल्ह्यातील बहुतांश कारखानदारांकडून सुरुवातीला आठराशे ते दोन हजाराचा भाव देण्याचे आमिष दाखवून ऊस उत्पादकांना आकर्षित केले. परंतु, सध्या अनेक कारखानदारांकडून पहिला हप्ता १५०० ते १६०० दरम्यान दिला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच कारखान्याकडून सभासदांऐवजी बिगर सभासदांच्या गेटकेन उसाला प्राधान्य दिले जात असल्याने सभासदांचा ऊस तोडीचा तारीख उलटून दीड ते दोन महिने झाले तरी फडातच वाळत आहे. पाणी द्यावे दर टोळी फडात उतरत नाही आणि पाणी न द्यावे तर तोडणी होत नसल्याने ऊस वाळत आहे. त्यातच तोडीसाठी येणाऱ्या टोळ्यांना एकरी ६ हजार, चालकाला खेपेला ५०० रुपयांची वाहन एन्ट्री अशी लूट होत असल्याने शेतकरी वैतागला आहे. यामुळेच सांजा शिवारातील शेतकऱ्यांनी दि.२४ रोजी दुपारी १ वाजता शिवारातील नामदेव नायकल यांच्या शेतात सामूहिकरीत्या उसाचा फड पेटवण्याच्या कार्यक्रम आयोजित करून यासाठी जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक, जिल्ह्यातील सर्व कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक व कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे. याबाबत निमंत्रणाचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले असून यावर २७ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.


काय आहेत शेतकऱ्यांचे आरोप : सांजा हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धाराशिव शुगर, तुळजाई-शंभू महादेव, एस.पी.शुगर, जयलक्ष्मी शुगर आदी साखर कारखान्याचे सभासद आहेत. त्यांच्या ऊसतोडीच्या तारखा उलटूनही ऊस तोड होत नसल्याने पाण्याअभावी ऊस वाळत आहे.तसेच ऊसतोडीसाठी पाठपुरावा केल्यास मुकादम, मजुरांपासून ते वाहनधारकांपर्यंत सगळ्यांकडून आर्थिक लूट होत आहे. तसेच सभासदांकडे कमी आणि गेटकेन उसाकडे जास्त वाहने पाठवली जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.


९ कारखान्यांकडून २५,७१,२३१ मे.ट. उसाचे गाळप
यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील ८ खासगी व ३ सहकारी अशा ११ साखर कारखान्याने आहेत. यापैकी ९ सुरू आहेत. या कारखान्यांनी आतापर्यंत २५ लाख ७१ हजार २३१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी ९.७७ च्या उताऱ्याने २५१११६६ क्विं. उत्पादन घेतले. यामध्ये विठ्ठलसाई, मुरूम -२.३२ लाख, डॉ. आंबेडकर, केशेगाव-३.६९ लाख, शिवशक्ती,वाशी-१.६१, नॅचरल शुगर, रांजणी-४.६३ लाख, शंभू महादेव (डीडीएनएस), हावरगाव-६८६४०, भीमाशंकर, पारगाव-७८८७०, धाराशिव शुगर, चोराखळी- १.६३ लाख, भैरवनाथ,सोनारी-२.६३ लाख, लोकमंगल माउली, खेड-४.५८ लाख, शिला अतुल शुगर नितळी-३६१०१ तर कंचेश्वर शुगरने १८ जानेवारीपर्यंत २.७४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

फड अर्धवट सोडण्याचे प्रकार
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे उसाचे फड अर्धवटच तोडून मजूर दुसरीकडे जात आहेत. अनेक ठिकाणी मजूर ऊसतोड करत असताना अचानक तेथील वाहने इतरत्र वळवली जात असल्यानेही नुकसान होत आहे. अशा अर्धवट फडात दुसऱ्या टोळ्या उतरत नसल्याने अडचणीत भर पडत आहे.Due to the arbitrariness of the factories, the agitation of the farmers to collect collective sugarcane

Post a Comment

 
Top