0
नवी दिल्ली :

तारुण्यात माथी भडकवल्याने तो इख्वानमध्ये (आयएसआयवर नाराज होऊन काश्मीरमध्ये स्थापन झालेली दहशतवादी संघटना) झाला दहशतवादी...भरकटलो आहोत याची जाणीव त्याला झाली... त्यानंतर तो जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला शरण आला... शरण आल्यानंतर त्याने दृढ निश्चय केला देशसेवेचा.... आणि भारतीय लष्करात २००४ साली दाखल झाला आणि बनला लान्स नाईक.... अत्यंत तडफदारपणे कर्तव्य बजावत दोनवेळा सेना पारितोषिक पटकावले.... प्राणपणाने जन्मभूमी आणि कर्मभूमीसाठी लढत असतानाच गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात वीरमरण आले... ही करुण कहाणी आहे जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील लान्स नाईक नाझीर अहमद वाणी यांची...

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांना वीरमरण आले होते. केंद्र सरकारने लान्स नाईक नाझीर अहमद यांच्या  बलिदानाची  दखल घेत अशोकचक्राने सन्मानित केले आहे. अहमद वाणी प्रादेशिक सेनेमध्ये भरती झाले होते, पण ३४ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या चकमकीमध्ये अहमद वाणी शहीद झाले होते. ३८ वर्षीय अहमद २००४ मध्ये भारतीय लष्कराला शरण आले होते. शरण येण्यापूर्वी अहमद इख्वान या दहशतवादी संघटनेत होते. 

भारतीय सैन्याने आत्मसमर्पण करण्याची संधी दिल्यानंतर ते शरण आले होते. अहमद नंतर सैन्यामध्ये भरती झाले. इंडियन आर्मीने ट्विटरवरून अहमद यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांच्या वडिलांचे लष्करी अधिकारी सांत्वन करतानाचा फोटो शेअर केला होता. फोटो कॅप्शनमध्ये तुम्ही एकटे नाही असे लिहिले होते. अत्यंत भावूक संदेश असलेला हा फोटो सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सलाम करत व्हायरल केला होता. फोटो पाहून निशब्द झाल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली होती.

Post a Comment

 
Top