0
जालंधर येथील लवली युनिव्हर्सिटी येथे १०६ वे नॅशनल सायन्स काँग्रेसची परिषद भरली आहे. या परिषदेला देशभरातील प्रख्यात शास्त्रज्ञ  उपस्थिती लावतात. या अशा भारतीय सायन्स क्षेत्रातील मोठ्या परिषदेत काही नावाजलेले शास्त्रज्ञ अशी काही वक्तव्ये करत आहेत की त्यामुळे फक्त वैज्ञानिक क्षेत्रातच नाही तर राजकीय क्षेत्रातही खळबळ माजण्याची शक्यता आहे.नॅशनल सायन्स काँग्रेस परिषदेत शुक्रवारी आंध्रप्रदेश विद्यापीठाचे कुलगुरु जी नागेश्वरा राव यांनी एक अजब दावा केला. त्यांनी महाभारतातील कौरवांचा जन्म हा स्टेम सेल्सची टेक्नॉलॉजी वापरून झाला होता. तसेच रामायणातील रावणाकडे २४ प्रकारची विमाने होती. त्याकळी श्रीलंकेत विमानतळही होते असाही दावा केला. या दाव्याने एकच खळबळ माजली आहे. असे वक्तव्य करणारे हे कुलगुरु इनऑरगॅनिक केमेस्ट्रीचे प्रध्यापक आहेत. त्यांनी ज्यावेळी हे वक्तव्य केले त्यावेळी सभागृहात शाळकरी मुलेही उपस्थित होती.

आंध्रचे कुलगुरु हे एकटेच नाहीत ज्यांनी नॅशनल सायन्स काँग्रेसच्या कार्यक्रमला ‘चार चांद’ लावले. तर याच सेशनमध्ये तामिळनाडूमधील के.जे. कृष्णन यांनी आयझॅक न्युटन आणि ॲल्बर्ट आईन्स्टाईन यांची थेअरी चुकीची आहे असे सांगितले. त्यांनी ग्रॅव्हिटेशनल वेव्हचे लवकरच नाव बदलण्यात येणार आहे. त्याचे नाव आता नरेंद्र मोदी वेव्ह असे ठेवण्यात येणार असल्याचा दावा केला. तसेच ग्रॅव्हिटेशनल लेसिंग इफेक्टचेही नाव बदलून हर्षवर्धन इफेक्ट होणार असल्याचे सांगितले. याच बरोबर त्यांनी विद्युत आणि चंबकीय हे एकच असल्याचाही दावा केला.

नॅशनल सायन्स काँग्रेसमध्ये केलेल्या या दाव्यांवर मुख्य प्रवाहतील शास्त्रज्ञानी नाराजी व्यक्त केली आहे. नॅशनल सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष मनोज कुमार चक्रवर्ती म्हणाले ‘मुलांसमोर अशा प्रकाराची माहिती सादर झाल्याने मला वाईट वाटले. आंध्रप्रदेश विद्यापीठाच्या कुलगुरुंनी अशाप्रकारे अशास्त्रीय माहिती देतात याने माला धक्का बसला. मी आमच्या टीमला या गोष्टी तपासण्यास सांगितल्या आहेत.’

Post a Comment

 
Top