शिवसेना व भाजप या दोन्ही मित्रपक्षांत सध्या विस्तवही जात नाही
मुंबई- शिवसेना व भाजप या सत्ताधारी मित्रपक्षातील वाढलेला तणाव कमी करण्यासाठी भाजप नेते व राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील नेहमीच पुढाकार घेतात. मकर संक्रांतीदिनीही त्यांनी ‘तिळगूळ डिप्लोमसी’ने हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पाटील यांनी मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांना तिळगूळ वाटले आणि गोड गोड बोलण्याचे आवाहनसुद्धा केले.
शिवसेना व भाजप या दोन्ही मित्रपक्षांत सध्या विस्तवही जात नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून भाजप नेत्यांवर कठोर टीका केली जात आहे. भाजप युतीसाठी आसुसलेला आहे. मोदी यांना केंद्रातली दुसरी टर्म काढण्यासाठी शिवसेना बरोबर हवी आहे. परंतु, शिवसेनेची नाराजी काही गेलेली नाही, शिवसेना आजही हटून बसलेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शहांचे निकटवर्तीय समजले जाणारे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते हे शिवसेनेचे आक्रमक मंत्री म्हणून परिचित आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या कधीकधी डरकाळ्या ऐकू येतात, त्या या दोघांच्याच असतात. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना त्यांनी अनेकदा आडवे घेतलेले आहे. दिवाकर रावते कडवट तर रामदास कदम आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. मित्रपक्ष भाजपला भर सभागृहात या दोघांनी
अनेकदा शिंगावरही घेतलेले आहे. भाजपला इशारे देण्यात हे दोघे शिवसेना नेते कायमच बिनीवर असतात.

मंगळवारी मकर संक्रांतीला मंत्रिमंडळ बैठक होती. ते निमित्त साधून चंद्रकांत पाटील यांनी रावते आणि कदम यांना तिळगूळ दिला…आज तरी गोड बोला…अशी विनंतीही केली. रावते आणि कदम यांनी पाटील यांच्या तिळगुळाला हसतहसत प्रतिसाद दिला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीतील तणाव निवळला.
Post a Comment