0
कोल्हापूर : 

येथील होली क्रॉस शाळेत मंगळवारी (दि.२२) दुपारी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक येऊन तोडफोड केली. शाळेच्या प्राचार्यांच्या कार्यालयात येऊन तेथील फर्निचरची तोडफोड करण्यात आली तसेच काचा फोडण्यात आल्या. खुर्च्यांची फेकाफेकीही करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे पालक आणि मुले मात्र धास्तावली आहेत.

तसेच अनेक पालकांनी शाळा चांगली आहे. तसेच येथील शुल्कही तुलनेत कमी आहे, अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली. यावेळी शाळेच्या प्राचार्या सिस्‍टर भारती यांनी या घटनेविषयी माहिती दिली.

ही शाळा इमारत शुल्क सक्तीने वसूल करत असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी हे आंदोलन केल्याचे वृत्त आहे. पालकांचे मात्र वेगळेच मत येथे दिसून आले. ही शाळा चांगली आहे. इथले शैक्षणिक वातावरणही चांगले आहे. तसेच येथील शुल्कही इतरांच्या तुलनेत कमी असल्याची माहिती पालकांनी दिली. तर या तोडफोडीमुळे मुले धास्तावतील अशी भीतीही काही पालकांनी व्यक्त केली तसेच आपली शाळेबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

संतापलेले पालक, पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले असून आपली शाळेबद्दल काही तक्रार नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. यावर पोलिस अधीक्षकांनी या घटनेतील दोषींना तत्‍काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले. दरम्यान, घटनास्थळी पोलिस पोहचले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Post a Comment

 
Top