0
लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांसह सहा जण थोडक्यात बचावले होते.

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याचे गुरुवारी (ता.3) समोर आले. सुदैवाने उड्डाणापूर्वीच बिघाड झाल्याचे लक्षात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. परिणामी मुख्यमंत्र्यांचा नियोजित सातारा दौऱ्याला विलंब झाला.

मिळालेली माहिती अशी की, सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुख्यमंत्री आज सातार्‍याच्या दौर्‍यावर आहेत. मुख्यमंत्री साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकाला वंदन केले. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री तिथे पोहोचणे अपेक्षित होते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे उघड झाले. अखेर मुख्यमंत्र्यांना सातार्‍यात पोहोचण्यात मोठा विलंब झाला.

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची 2 वर्षांतील सहावी घटना...

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होण्याच्या तसेच अपघात होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची दोन वर्षांतील ही सहावी घटना आहे.

लातूरमध्ये कोसळले होते मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर..

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील शिवार संवाद कार्यक्रम आटोपून मुंबईकडे निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उड्डाण घेतल्यानंतर विजेच्या ओव्हरहेड तारांना पंख्याचे पाते धडकल्याने काही सेकंदातच खाली कोसळले होते. ही घटना 26 मे 2017 रोजी घडली होती.

खराब हवामानामुळे पायलट हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न करत असताना क्रॅश लँडिंग करावे लागले. या अपघातात मुख्यमंत्र्यांसह सहा जण थोडक्यात बचावले होते. डॉक्टरांच्या एका पथकाने मुख्यमंत्र्यांसह सर्वांची वैद्यकीय तपासणी केली होती. त्यांचा रक्तदाब सामान्य असल्याचे आढळून आले तसेच कुणालाही काहीही गंभीर दुखापत झाली नाही. केतन पाठक यांच्या डोक्याला मार लागला होता.तसेच हाताला थोडे खरचटले होते. मुंबईहून विशेष विमान मागवून मुख्यमंत्री लातूरमार्गे विमानाने मुंबईकडे रवाना झाले होते.

वाचा.. केव्हा आणि कुठे झाला मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरला अपघात..

- अलिबाग येथे 7 जुलै 2017 रोजी हेलिकॉप्टर लँडिंग मार्कच्या पुढे सरकल्याने मागील पाते मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला लागण्याचा धोका उद्भवला होता.

- नाशिक येथे 9 डिसेंबर 2017 रोजी हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती.

- भाईंदर येथे 11 जानेवारी 2018 रोजी हेलिकॉप्टर मार्गात केबल आल्याने लँडिंग होणाऱ्या हेलिकॉप्टरने पुन्हा टेक ऑफ केले.

- सांगल येथे 24 ऑक्टोबर 2018 रोजी हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात सिग्नल मिळत नसल्याने हेलिकॉप्टर कोल्हापूर शहरावर घिरट्या मारत होते.

- मुंबई येथे 3 जानेवारी 2019 रोजी उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे उघड झाले. परिणामी त्यांच्या नियोजित सातारा दौऱ्याला विलंब झाला.
Technical issue in CM Devendra fadnaviss helicopter in Mumbai

Post a Comment

 
Top