0
सरकारी नोकरी आता उपाय उरला नसल्याची मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

नागपूर- सरकारमध्ये दरवर्षी २५ हजार नोकऱ्या तयार होतात. तेवढे तरुण तर एका तालुक्यातच निघतात. त्यामुळे सर्व समाजांना आरक्षण दिल्यानंतरही ९० टक्के तरुणांना नोकरी मिळणार नाही. त्यामुळे सरकारी नोकरी हा आता उपाय राहिलेला नाही. हळूहळू हे लक्षात येईल. आरक्षणाला आज आहे तसे माहात्म्य व महत्त्व नंतर कमी कमी होत जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नागपुरात आयोजित जागतिक मराठी संमेलनात घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांची ही स्पष्टोक्ती केली आहे. कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे व लेखक आशुतोष शेवाळकर यांनी त्यांना प्रश्न विचारले.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकारी महाविद्यालयांत आरक्षण फारसे नाही. बहुतांश महाविद्यालये अल्पसंख्याक दर्जाची असल्याने तेथे आरक्षण देता येत नाही. शिक्षण आणि नोकरीच्या संधी खासगी क्षेत्रात असून त्यासाठी समाजाला तयार करावे लागेल. शाळेच्या दाखल्यावरील जात कायद्याने जाऊ शकत नाही. त्यासाठी सामाजिक प्रबोधन आणि शिक्षण द्यावे लागेल. कारण आजही सर्वाधिक बेघर आणि गरिबी अनुसूचित जाती आणि जमातींत आहेत. त्यामुळे सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आर्थिक आरक्षणाचा विचार करता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सर्व समाजांत दोन टोकाची परिस्थिती आहे. एकीकडे स्वकर्तृत्वाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवणारे लोक आहेत, तर दुसरीकडे संकुचित आणि नकारात्मक मानसिकतेला कवटाळून बसलेले लोक आहेत. पण सर्वांना प्रगती करायची असेल तर संकुचित आणि नकारात्मक मानसिकता बाजूला ठेवावी लागेल, असे ते म्हणाले.

ई-क्रांतीमुळे २३ कोटींहून जास्त रोजगार जाणार
कोणताही राजकारणी राज्य चालवत नसतो, तर त्या राज्यातील तरुणाई, विचारवंत व लोकच ते पुढे नेत असतात. ट्रिलियन डाॅलर इकाॅनाॅमी तयार करण्याची संधी फक्त महाराष्ट्राला आहे. गुजरात व तामिळनाडू या राज्यांपेक्षाही जास्त विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. 'ई-क्रांती'चे तोटे आहेत तसेच फायदेही आहेत. आधी पिढी २० वर्षांनंतर बदलायची, नंतर ती १५ वर्षांनंतर बदलत असे. आता ७ वर्षांनंतर बदलते, इतका हा वेग वाढला आहे. ई-क्रांती'मुळे रातोरात नवी व्यवस्था उभारण्याची आणि ती नष्ट करण्याची ताकद निर्माण झाली आहे. पण याचमुळे कृत्रिम गुणवत्ता तसेच इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ४.ओ' आली आहे. याची सर्वात मोठी ताकद डेटा आहे. यामुळे २३ कोटी रोजगार हातून जाईल. पण २५ कोटी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

जीवनपद्धती नाकारल्यास हिंदुत्व जागवावे लागेल
हिंदुत्व नेहमीच सहिष्णू राहिलेले आहे. सहिष्णुतेशिवाय हिंदुत्व असू शकत नाही. हिंदुत्व कधीच संकुचित होऊ शकत नाही. ते नेहमीच व्यापक राहिले आहे. परंतु या जीवनपद्धतीला नाकारण्याचा प्रयत्न होतो तिथे हिंदुत्व जागवावे लागेल. हिंदू असण्याचा मला मनापासून अभिमान आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
90% of the youth will not get a job even after giving reservation to everyone

Post a Comment

 
Top