अपघातानंतर घटनास्थळी तणाव, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदीसदृष्य बंदोबस्त लावला
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील गुरुपल्ली येथे ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जण ठार तर 40 जण जखमी झाले आहेत. जखमींनी तातडीने अहेरी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी सुमारे 15 ट्रक पेटवून दिले. ही धडक इतकी जोरदार होती की, यात बसच्या एका बाजूचा चुराडा झाला.
बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास
एसटी बस (एमएच 40, एक्यू-६०३४) एटापल्लीकडून आलापल्लीकडे जात होती. गुरूपल्ली गावाजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या एमएच-३१, सीक्यू-३३८६ ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यात 8 जण जागीच ठार झाले असून 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. 29 जणांना किरकोळ मार लागला आहे. जखमींना अहेरी व चंद्रपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये अहेरी वनविभागात कार्यरत क्षेत्रसहायक प्रकाश अंबादे (वय ४८), अहेरी उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत परिचारिका मंजूळा करपाते (वय ४८), न्यायालय कर्मचारी श्यामला डोंगरे वय (४७), अमोल गावंडे (वय १६) आणि 4 शाळकरी मुलांचा समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी सुमारे १५ ट्रक पेटवून दिले. तर पाच ट्रकची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदीसदृष्य बंदोबस्त लावला होता.

Post a Comment