0
शुक्रवारी महाराष्ट्राच्या खात्यात ८ सुवर्णांसह महाराष्ट्राकडे १९५ पदके जमा झाली आहेत.

पुणे- खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राची सुवर्णमय विजयी मोहीम कायम आहे. शुक्रवारी १७ वर्षांखालील स्पर्धेत महाराष्ट्राच्या बाॅक्सरने गोल्डन पंच मारला. यासह यजमानांनी बाॅक्सिंगमध्ये पाच सुवर्ण, एक रौप्य पटकावले. टेनिसमध्ये महाराष्ट्राने दोन सुवर्ण, एक रौप्य पटकावले. या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या खात्यात ७५ सुवर्णपदकांसह १९५ पदके जमा झाली. मात्र बास्केटबॉल, व्हॉलीबॉलमध्ये महाराष्ट्राला पराभवाचा सामना करावा लागला. पुणे येथील शिवछत्रपती क्रीडानगरी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पहिल्या दिवसापासून केलेल्या दमदार कामगिरीमुळे आपले वर्चस्व निर्माण केले आहे. याच कामगिरीची पुनरावृत्ती शुक्रवारी १७ वर्षांखालील गटात झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केली. बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राच्या देविका घोरपडे, मिताली गुणेले, बिस्वामित्र चोंगथोम, शेखोमसिंग व येईफाबा मितेई यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. हे युवा बाॅक्सर आपापल्या गटात सुवर्णपदकांचे मानकरी ठरले. 

अटीतटीच्या झालेल्या लढतीत पुण्याच्या आकाश गोरखाला मात्र रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. शुक्रवार टेनिससाठीदेखील लकी ठरला. महाराष्ट्राच्या गार्गी पवार हिने दुहेरीत सुवर्ण व एकेरीत कांस्यपदक आपल्या नावावर केले. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या अरमान भाटिया व ध्रुव सुनीश महाराष्ट्राला आणखी एक सुवर्ण मिळवून दिले. मुलींच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मिहिका यादवला समाधान मानावे लागले. मुंबईकर असलेल्या युवा टेनिसपटू आर्यन भाटियाला १७ वर्षांखालील गटात पराभवाला सामोरे जावे लागले.

यजमान महाराष्ट्राची सुवर्णपदकांची पंचाहत्तरी 
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने सुवर्णपदकांची पंचाहत्तरी गाठली. शुक्रवारी महाराष्ट्राच्या खात्यात ८ सुवर्णांसह महाराष्ट्राकडे १९५ पदके जमा झाली आहेत.

गार्गी-प्रेरणाचा दुहेरीत विजय
महाराष्ट्राच्या टेनिसपटू गार्गी हिने दुहेरीत प्रेरणाच्या साथीत सुवर्णपदक पटकावले. या जोडीने फायनलमध्ये महाराष्ट्राच्याच सई भोयार व हृदया शहाचा पराभव केला. त्यांनी ६-१, ६-१ ने शानदार विजय संपादन केला. गार्गी हिने त्याआधी एकेरीत कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत आंध्र प्रदेशच्या लक्ष्मी रेड्डी हिच्यावर ६-३, ६-३ असा सफाईदार विजय मिळवला. तिने दोन्ही सेट्समध्ये क्रॉसकोर्ट फटक्यांचा चौफेर खेळ केला.

हे पदक वडिलांनाच समर्पित : गार्गी 
खेलो इंडिया महोत्सवात मी पदक मिळवले पाहिजे, असे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. येथे मी त्यांचे स्वप्न साकार केले. तथापि माझे हे यश पाहण्यासाठी ते हयात नाहीत, याचेच मला दु:ख वाटते असे सांगून गार्गी म्हणाली, आदर पूनावाला अकादमीचे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीवायसी जिमखाना येथे सराव करते. यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत मला विजेतेपद मिळाले होते. त्या अनुभवाचा फायदा मला येथे दोन पदके मिळवताना झाला.

मिहिका, आर्यनला राैप्यपदक
मुलींच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मिहिका यादव हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत तिला अव्वल मानांकित खेळाडू महेक जैन हिने ६-४, ६-१ असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये महेक हिला मिहिका हिने चिवट झुंज दिली. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात आर्यन भाटिया या महाराष्ट्राच्या खेळाडूला गुजरातच्या देव जेविया याच्यापुढे पराभव पत्करावा लागला. हा सामना देव याने ७-५, ६-३ असा जिंकला.

टेनिसमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका 
महाराष्ट्राच्या गार्गी पवार हिने दुहेरीत सुवर्ण व एकेरीत कांस्यपदक जिंकले. तिने टेनिसमधील १७ वर्षांखालील गटात कौतुकास्पद कामगिरी केली. तिने दुहेरीत प्रेरणा विचारे हिच्या साथीत १७ वर्षांखालील दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या अरमान भाटिया व ध्रुव सुनीश ही जोडी विजेती ठरली. महाराष्ट्राने या सुवर्णपदकांबरोबरच तीन रौप्य व एक कांस्यपदकाचीही कमाई केली. यासह महाराष्ट्र संघाला या खेळ प्रकारातही आपल दबदबा कायम ठेवता आली. यात गार्गी आणि प्रेरणाची खेळी काैतुकास्पद ठरली.

अरमान-ध्रुवला किताब 
आर्यन याचा मोठा भाऊ अरमान याने ध्रुव याच्या साथीत २१ वर्षांखालील दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. त्यांनी नितीन सिन्हा व इशाक इक्बाल या बंगालच्या खेळाडूंचा २-६, ६-३, १०-६ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर त्यांनी सर्व्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवत विजयश्री खेचून आणली.

Post a comment

 
Top