0
दुष्काळाच्या झळा भूजल सर्वेक्षण अहवाल, एप्रिलपर्यंत राज्यात ११,५०० गावांत पाणीबाणी

मुंबई- राज्यातील पाणीसाठ्यांची पातळी व भूजलस्तर दिवसेंदिवस खालावत असून सध्या राज्यातील धरणांत फक्त ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गंभीर बाब म्हणजे मराठवाड्यातील पाणीसाठा अवघा १६ टक्क्यांवर आला असून काही मोठी धरणे डिसेंबरअखेरीसच कोरडी पडली आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यापासूनच मराठवाड्यातील तब्बल ४५७२ गावांना १०० टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत राज्याच्या धरणांतील पाणीसाठा १९ टक्क्यांनी घटला असून ११ हजारांपेक्षा जास्त गावांतील भूजलपातळीही गतवर्षीच्या तुलनेत १ ते ३ मीटरने अधिक घटली आहे. परिणामी एप्रिल महिना उजाडताना राज्यातील ११,५०० गावांतील पाणीसाठे कोरडेठाक पडण्याची भीती राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील बहुतांश गावांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. जून ते सप्टेंबरदरम्यान राज्यात सरासरीच्या तुलनेत अवघा ७७ टक्के पाऊस झाल्याने बहुतांश धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. गतवर्षीच्या डिसेंबरअखेरीस राज्यातील प्रमुख धरणे आणि जलाशयांमध्ये सरासरीच्या तुलनेत ६४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र त्यात १९ टक्क्यांची घट झाली असून तो अवघा ४५ टक्क्यांवर आला आहे. संपूर्ण राज्याच्या तुलनेत मराठवाड्यातील स्थिती फारच गंभीर असून मराठवाड्यातील माजलगाव, मांजरा, सिद्धेश्वर, सीना कोळेगाव यासारखे मोठे जलसाठे डिसेंबरअखेरीसच कोरडेठाक पडले आहेत.

सद्य:स्थितीत राज्यात १३७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून त्यापैकी ७९३ टँकर एकट्या मराठवाड्यात चालवले जात आहेत. मराठवाड्यातील आठपैकी औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांत सर्वात भीषण पाणीटंचाई जाणवत असून एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी ४९७ टँकरच्या फेऱ्या दररोज केल्या जात आहेत.

मराठवाड्यातील पाणीपातळीत ३ मीटरची घट, जानेवारीपासूनच टंचाईची स्थिती 
एकीकडे जलसाठ्याची स्थिती चिंताजनक असतानाच राज्यातील भूजलपातळीही कमालीची खालावल्याचा अहवाल राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा म्हणजेच जीएसडीएने दिला आहे. राज्यातील १६७ तालुक्यांतील ११ हजार ४८७ गावांतील भूजलपातळी गतवर्षीच्या तुलनेत १ ते ३ मीटरने घटली आहे. यापैकी मराठवाड्यातील १४११ गावांतील पातळीत ३ मीटरपेक्षा अधिक, १२१३ गावांत २ ते ३ मीटरपेक्षा अधिक, तर १९४८ गावांत १ ते २ मीटरने घट झाली आहे. गंभीर बाब म्हणजे राज्यातील २९९० गावांना जानेवारी, तर ५५५६ गावांना एप्रिलपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे तब्बल ४ हजार ५७२ गावे ही मराठवाड्यातील असून एप्रिलनंतर या गावांना शंभर टक्के पाणीपुरवठा टँकरने करावा लागणार आहे.

सरकारचे सिंचनवृद्धीचे दावे फोल : देसरडा 
राज्यातील जलसाठ्यांची सद्य:स्थिती पाहता राज्य सरकारचे सिंचनवृद्धीचे सर्व दावे फोल ठरल्याची टीका जलतज्ज्ञ प्रा. एच.एम.देसरडा यांनी केली आहे. ते म्हणाले की, राज्यातील १६ हजार गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे केल्याने २४ लाख हेक्टर क्षेत्रावरील सिंचनात वाढ झाल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केला होता. मात्र हा प्रकार म्हणजे फक्त घोषणांचा पाऊस असून निसर्गानेच या सर्व दाव्यांचा पंचनामा केला आहे. सरकारचे दावे आणि वस्तुस्थितीत मोठी तफावत आढळत असल्याचा टोलाही प्रा. देसरडा यांनी या वेळी हाणला.Only 45 percent water avilable in the dams of the state

Post a Comment

 
Top