दानवे म्हणाले, जे येतील त्यांच्यासह व जे येणार नाहीत त्यांना सोडून निवडणूक लढवण्यास भाजप सज्ज झाला आहे.
पुणे,औरंगाबाद : पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा पावलावर पाऊल टाकत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही आता शिवसेनेबाबत 'पटक देंगे'ची भाषा करू लागले आहेत. राज्यातल्या ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा पूर्ण झाला आहे. त्यापैकी ४० ठिकाणी आम्ही युतीशिवाय जिंकू,' असा दावाही त्यांनी गुरुवारी पुण्यात केला. जे येतील त्यांच्यासह व जे येणार नाहीत त्यांना सोडून निवडणूक लढवण्यास भाजप सज्ज झाला आहे, असे सांगताना त्यांनी युतीची शक्यताही कायम ठेवली. दुसरीकडे भाजपचे नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र युती हाेईलच, असा दावा औरंगाबादेत केला आहे.
दानवे म्हणाले, 'भाजपने स्वतंत्र मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवसेना व भाजपमध्ये वादाचा मुद्दा नाही. मतविभाजनाचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होणार आहे. त्यामुळे लवकरच युतीसंदर्भातली बोलणी होतील,' असेही दानवे यांनी सांगितले.
युती हाेणारच, निर्णय शिवसेनेने घ्यावा
भाजप पहिल्यापासूनच युतीसाठी अनुकूल आहे. एकमेकांविरोधात वक्तव्ये येत असली तरी शिवसेनेशी आमची युती हाेणारच आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली तरी कोणी कोणती जागा लढवायची याचे वाद होत आहेत. मात्र, तरीही त्यांची आघाडी होणारच आहे. त्यामुळे शिवसेना- भाजपमध्येही वाद असला तरी युती नक्की होईल. मात्र, युती करायची की नाही याचा निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Post a Comment