0
4 वर्षांत शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात फक्त 626 रु. वाढ

औरंगाबाद- राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याने त्यांच्या पगारात श्रेणीनिहाय ४ ते १४ हजारांची वाढ होणार आहे. या उलट मागील चार वर्षांत शेतकऱ्याच्या वार्षिक उत्पन्नात मात्र सरासरी केवळ ६२६ रुपये वाढ झाली आहे. नाबार्डच्या आर्थिक समावेशकताविषयक सर्वेक्षणातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची ही वाढ समोर आली आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या सर्वेक्षणानुसार, देशातील शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नात गेल्या चार वर्षांत २५०५ रुपयांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये देशातील शेतकऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न ८३९१ रुपये आहे. चार वर्षांपूर्वी ते ६४२६ रुपये होते. या हिशेबाने दर वर्षाला सरासरी ६२६.२५ रुपयांनी शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न वाढते आहे. देशातील ४३ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी असून त्यांच्यावर सरासरी ९१,८५२ रुपये कर्ज आहे. महाराष्ट्रात ३५ टक्क्यांहून जास्त शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी असल्याचे समोर आले आहे.

देशातील २९ राज्यांच्या २४५ जिल्ह्यांत हे सर्वेक्षण घेण्यात आले.

तेलंगणात सर्वाधिक शेतकरी कुटुंबांवर कर्ज
देशात ८ ते ९ राज्यांतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांवर कर्जाचा डोंगर आहे. तेलंगण, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात हे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील सरासरी ४३ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी आहेत.

प्रमुख राज्ये : कर्ज असणारी शेतकरी कुटुंबे
तेलंगण : ७९ टक्के
आंध्र प्रदेश : ७६ टक्के
कर्नाटक : ७५ टक्के
अरुणाचल प्रदेश : ६९ टक्के
मणिपूर : ६२ टक्के
तामिळनाडू : ६१ टक्के
ओडिशा : ५४ टक्के
उत्तराखंड : ५० टक्के
बिहार : ४८ टक्के
पंजाब : ४४ टक्के
मध्य प्रदेश : ४३ टक्के
महाराष्ट्र : ३५ टक्के
गुजरात : २७ टक्के

१ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने वेतनवाढ :
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मासिक ४ ते ५ हजार वाढ तृतीय श्रेणीच्या वेतनात ५ ते ८ हजार वाढ द्वितीय-प्रथम श्रेणी अधिकारी, ९ ते १४ हजारांपर्यंत वाढ.

कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २३ टक्क्यांपर्यंत वाढ
जानेवारीपासून राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयाेग लागू करण्याची घोषणा नुकतीच देवेंद्र फडणवीस सरकारने केली होती. यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या हाती वाढीव वेतनाचे लाभ पडणार अाहेत. १७ लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी व सुमारे ७ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होईल. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २३ टक्क्यांपर्यंत वाढ होणार.
News about Farmers

Post a Comment

 
Top