0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील घटना धडकेत एक कार थेट दरीत कोसळली, ५ जण गंभीर जखमी

पुणे- चालकाचे नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या लेनमध्ये घुसून ट्रकने दोन कारला भीषण धडक दिल्याची घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. धडकेनंतर एक कार महामार्गावरून थेट दरीत कोसळली, तर दुसरी कारही रस्त्याच्या कडेला जाऊन अडकली. त्यानंतर भरधाव वेगातील हा ट्रकही महामार्गावरच उलटला.

याबाबत खाेपाेली पाेलिस ठाण्यात अर्जुनभाई टापियावाला (गुजरात) यांनी ट्रकचालकाविराेधात तक्रार दिली आहे. सिमेंटची पाेती घेऊन मालवाहतूक करणारा ट्रक (एमएच १२ एलटी ३३५६) मुंबईकडून पुण्याच्या दिशेला भरधाव येत हाेता. खाेपाेली परिसरात ओडाेशी बाेगद्याच्या पुढे गेल्यानंतर भरधाव ट्रकवरून चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक त्याच वेगात दुभाजक ताेडून दुसऱ्या लेनमध्ये शिरला. या वेळी पुण्याहून मुंबईच्या दिशेला जात असलेल्या आंग्रे कुटुंबीयांच्या सेलेराे (एमएच १२ पीटी ९०३१) कारला ट्रक सुरुवातीला धडकला. त्यानंतर कुडेकर यांच्या स्विफ्ट कारला (एमएच १२ केएन ३४६०) त्याने धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की त्यामुळे स्विफ्ट कार थेट महामार्गालगतच्या ४० फूट खाेल दरीत जाऊन काेसळली. त्यानंतर टापियावाला यांच्या इनाेव्हा कारला (जीजे १६ एयू ३६४७) धडकून ट्रकही रस्त्यावर आडवा झाला. यात ४ जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.


मायलेकींचा मृत्यू, बाप गंभीर जखमी
या अपघातामध्ये औंध येथील आंग्रे कुटुंबातील चित्रा आंग्रे (४२) आणि निकिता आंग्रे (२५) या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. तर निकिताचे वडील अविनाश आंग्रे गंभीर जखमी आहेत. मृणाली श्रीकांत कुडेकर (६०, एरंडवणा, पुणे) व हसन मेहबूब शहा पटेल (मुंबई) यांचाही मृतांत समावेश आहे. अविनाश आंग्रे यांच्यासह भास्कर बिरारी आणि अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर ट्रक रस्त्यावरच उलटल्याने ट्रकमधील सिमेंटची पोती महामार्गावर विखुरली गेली. त्यामुळे दोन्हीकडून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून संपूर्ण वाहतूकच ठप्प झाली. याबाबतची माहिती मिळताच महामार्ग पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेला ट्रक बाजूला करत दाेन्ही बाजूंची वाहतूक काेंडी कमी करण्यात आली. या अपघाताचा खाेपाेली पाेलिस पुढील तपास करीत आहेत.
Accident in Pune-Mumbai Highway

Post a Comment

 
Top