0
लखनऊ - एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टीने उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीची घोषणा केली आहे. ८० जागा असलेल्या यूपीत दाेन्ही पक्ष प्रत्येकी ३८-३८ जागा लढवतील. सपा-बसपाच्या या आघाडीत काँग्रेसला स्थान नाही. मात्र, ही आघाडी सोनिया गांधींंच्या रायबरेली व राहुल यांच्या अमेठी या दोन मतदारसंघात उमेदवार देणार नाही. या प्रकारावर प्रख्यात कवी, शायर मुनव्वर राणा यांचा एक शेर मार्मिक ठरतो. तो असा...


किसी को घर मिला, हिस्से में या कोई दुकान आई... मैं घर में सबसे छोटा था, मेरे हिस्से में माँ आई...


दरम्यान, दोन जागा अजित सिंह यांच्या रालोदला दिल्या आहेत. मात्र त्याची औपचारिक घोषणा झालेली नाही. सपा अध्यक्ष अखिलेश यादव व बसपाप्रमुख मायावती यांनी शनिवारी प्रथमच संयुक्त पत्रपरिषद घेतली. यूपीत सपा-बसपा २५ वर्षांनी एकत्र आले आहेत. १९९३ मध्ये दोन्ही पक्ष भाजपविरुद्ध लढले होते. १९९५ मध्ये लखनऊ गेस्ट हाऊस घटनेनंतर त्यांची आघाडी मोडली होती.

आतापर्यंत सपा-बसपा हे पक्ष फक्त दोन वेळा आले एकत्र, तेही भाजपविरुद्धच
2019- व्यासपीठावर कांशीराम, मुलायमसिंह यांचे छायाचित्र नव्हते; 'सपा'पेक्षा बसपाचाच झेंडा मोठा होता.
1993 - तेव्हा बसपा अध्यक्ष कांशीराम व मायावतींनी सपा नेते मुलायमसिंह यांच्यासोबत विधानसभा लढवली होती.

मायावतींनी एकदा घेतले कांशीराम यांचे नाव
मायावती व अखिलेश यादव शनिवारी प्रथमच एका व्यासपीठावर आले. मायावतींची खुर्ची अखिलेशपेक्षा मोठी होती. शिवाय पोस्टरवर बसपाचा झेंडा सपापेक्षा थोडा मोठा होता. बसपाचे संस्थापक कांशीराम व सपाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचा फोटो नव्हता. मायावतींनी एकदा कांशीरामांचे नाव घेतले. पण अखिलेश यांनी मुलायम यांचा साधा उल्लेखही केला नाही.

25 वर्षांपूर्वी बसपा-सपाने राम लाट परतवली, आता मोदी लाट संपुष्टात आणण्याची तयारी
१९९२ मध्ये बाबरी मशिदीच्या पतनानंतर कल्याण सिंह यांनी राजीनामा दिला. १९९३ मध्ये सपा-बसपा एकत्र आले अन् मुलायमसिंह सीएम बनले. तेव्हा 'मिले मुलायम कांशीराम, हवा में उड़ गए जयश्री राम' हा नारा देण्यात आला होता.

राहुल म्हणाले, आम्ही लढू अन् सरप्राइजही देऊ
सपा-बसपात आघाडीत काँग्रेसला स्थान मिळाले नसल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. आम्ही उत्तर प्रदेशात पूर्ण क्षमतेने लढू आणि लोकांना सरप्राइज देऊ, असे ते म्हणाले. काँग्रेसकडे लोकांना देण्यासारखे बरेच काही आहे. सपा, बसपा नेत्यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांना हवे ते करण्याचा अधिकार आहे.
After 25 years SP-BSP will contest the election together against BJP in Uttar Pradesh 

Post a Comment

 
Top