बारहातेंनी हेल्मेटचा वापर न करता दुचाकीला असे लटकवले होते.
- बीड- हेल्मेट असूनही केवळ ते वापरण्याचा कंटाळा करत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील एका वकिलाने हेल्मेट दुचाकीला लॉक केले. बीडजवळ या वकिलाचा मंगळवारी रात्री अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या तरुण वकिलावर सध्या औरंगाबादेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे जिल्हा पोलिसांनी रस्ते अपघाताबाबत केलेल्या अभ्यासाचा अहवाल बुधवारी जाहीर केला. यामध्ये हेल्मेट न वापरल्याने वर्षभरात डोक्याला मार लागून १४१ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले, तर १५४ जण जखमी झाले आहेत.
अण्णासाहेब राजेंद्र बारहाते (३०, रा. बारहातेवाडी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) हे व्यवसायाने वकील आहेत. ते औरंगाबाद खंडपीठात वकिली करतात. मंगळवारी रात्री दुचाकीवरून (एमएच २०, बीएस ६५२४) औरंगाबादहून आपल्या गावी निघाले होते. बीड-गेवराई रस्त्यावर पारगावजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी स्थानिकांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात हलवलेे.वर्षभरामध्ये अपघातात १४१ जणांचा मृत्यू
दुसरीकडे जिल्हा पोलिस दलाने रस्ते अपघात आणि हेल्मेट याबाबत केलेल्या अभ्यासाचा अहवाल पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी बुधवारी जाहीर केला. हेल्मेट न वापरल्याने वर्षभरात अपघातात जिल्ह्यात तब्बल १४१ जणांचा मृत्यू झाला, तर १५४ जणांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली.
Post a Comment