तेलतुंबडेंवर खटला चालवण्यास आराेप पुरेसे
- मुंबई - एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा हिंसाचारातील आरोपी आनंद तेलतुंबडे यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. न्या. बी.पी. धर्माधिकारी व एस.व्ही. कोतवाल यांचे न्यायपीठ म्हणाले, 'या कटाची पाळेमुळे खूप खोलवर आहेत, त्याची परिणतीही अत्यंत गंभीर आहे.' तेलतुंबडे यांनी अापल्याविरुद्धचा एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.
आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असून आपल्याला अडकवले जात असल्याचा दावा तेलतुंबडे यांनी केला होता. त्यावर पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत. कोर्टाने ही याचिका २१ डिसेंबरला फेटाळली होती. त्याचे आदेश सोमवारी मिळाले. याप्रकरणी तपासावर समाधान व्यक्त करत कोर्ट म्हणाले, पुणे पोलिसांकडे तेलतुंबडे यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत. त्यांच्यावर लावलेले आरोप आधारहीन नाहीत. प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) या संघटनेशी तेलतुंबडे यांच्या संबंधांचा तपास केला गेला पाहिजे.खटला चालवण्यास पुरेसे पुरावे
कोर्ट म्हणाले, 'तेलतुंबडेंविरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेशी सामग्री आहे. हा गंभीर गुन्हा आहे. हे एक मोठे कारस्थान असून त्याचे परिणामही भयंकर आहेत. कटाच्या गांभीर्याकडे पाहत तपास संस्थेला आरोपीविरुद्ध पुरावे शोधण्यासाठी पुरेसा वेळा दिला गेला पाहिजे.'
Post a Comment