0
महापालिकेची धडक माेहीम

जळगाव- शहरात गेल्या दाेन महिन्यांपासून चर्चा सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन माेहिमेला खऱ्या अर्थाने गुरुवारी सुरूवात झाली. एकाच वेळी पाच रस्त्यावरील अतिक्रमणावर जेसीबीचा दणका हाणत अनधिकृत बांधकाम ताेडण्यास सुरुवात झाली. काेर्टाच्या भिंतीला लागून असलेल्या ३१ दुकानदारांचा प्रचंड विराेध झुगारून प्रशासनाने पहिल्या दिवशी तब्बल अाठ तास सलग धडक माेहीम राबवण्यात अाली. यात वर्षानुवर्ष अतिक्रमणाच्या कचाट्यात सापडलेले रस्ते माेकळे झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुंबई व पुणे या महानगरांप्रमाणे रस्ते वाहतुकीसाठी माेकळे करावी, अशी मागणी केली जात अाहे. त्याच धर्तीवर शहरातील मुख्य बाजारपेठेतील पाच रस्त्यांवर ही माेहीम हाती घेण्यात अाली. गुरुवारी सकाळी ९ वाजता ६ जेसीबी, १५ ट्रॅक्टर व १५० कर्मचाऱ्यांचा ताफा महापालिकेत दाखल झाला हाेता. त्यानंतर १० वाजतता पाचही पथके कारवाईसाठी रवाना करण्यात अाले. अतिक्रमण कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेण्याची शक्यता लक्षात घेता तगडा बंदाेबस्त ठेवण्यात अाला हाेता.

शहरातील चाैबे शाळेजवळील काढलेल्या अतिक्रमणामुळे माेकळा झालेला रस्ता आणि परिसर.
महापालिकेने गुरुवारी अतिक्रमण हटाव माेहीम हाती घेतली. त्यात अायुक्त चंद्रकांत डांगे यांनी सूक्ष्म नियाेजन करून प्रमुख ५ रस्त्यांवर झालेले अतिक्रमण हटवले. कुठेही गालबाेट लागू नये म्हणून तगडा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. पहिल्या दिवशी काेर्ट चाैक, चाैबे शाळा, काँग्रेस भवनचा रस्ता या माेहीमेत माेकळा झाला.

अतिक्रमण हटाव माेहीम शुक्रवारीही राबवण्यात येणार असल्याची माहिती अायुक्त डांगे यांनी दिली. महापालिका स्थापनेनंतर तत्कालीन अायुक्त द. प. मेतके यांनी सर्वप्रथम अतिक्रमण हटाव माेहीम व्यापक स्वरुपात हाती घेतली हाेती. त्यानंतर त्यांनी रस्ते रुंदीकरणाला प्राधान्य दिले हाेते. त्यानंतर अायुक्त चंद्रकांत डांगे यांनी गुरुवारी हाती घेतलेली ही दुसरी सर्वात माेठी माेहीम असल्याचे सांगण्यात अाले.

एसपी देत हाेते सूचना

अायुक्त डांगे यांच्यासह पाेलिस अधिक्षक दत्ता शिंदे, अपर अधिक्षक लाेहित मतानी, प्रशांत बच्छाव व वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून हाेते. त्यामुळे काेर्ट ते सुभाष चाैक ते राजकमल टाॅकीज परिसरात छावणीचे स्वरूप अाले हाेते. मनपा व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १० ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.

काँग्रेसभवनचा रस्ता माेकळा
शहरातील प्रचंड वर्दळ असलेला टाॅवर ते खैरनार अाॅप्टीकल दरम्यानचा रस्ता नावालाच माेठा हाेता. परंतु, त्या ठिकाणी काॅग्रेसभवनसमाेर दुकानांचे अतिक्रमण हाेते. गेल्या दाेन महिन्यांपासून नियाेजित अतिक्रमणावर कारवाई करत काॅग्रेस भवनसमाेरील वर्षानुवर्ष असलेले अतिक्रमण काढण्यात अाले. त्यामुळे सायंकाळनंतर हा रस्ता सगळ्यात माेठा रस्ता असल्याचे चित्र दिसले.

दुकानांसमाेरील पेव्हर ब्लाॅकही हटवले, नियमानुसार कारवाई
पाचही रस्त्यांवर गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण हाेते. त्यामुळे वाहने थेट रस्त्यावर उभी केली जात हाेती. अामच्या अतिक्रमणाला काेणी हात लावणार नाही या अार्विभावात असलेल्या दुकानदारांना पालिकेने दणका दिला. दुकानांसमाेरील गटारी माेकळ्या करत सजावटीसाठी लावण्यात अालेले पेव्हर ब्लाॅक उखडून टाकले. यात सराफा बाजारातील शाे-रूम तसेच राजकमल टाॅकीज राेडवरील बड्यांच्या अतिक्रमणावरही जेसीबी चालवले. कायदा-सुव्यवस्थेला गालबाेट लागू नये म्हणून सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एसपी शिंदे हे तळ ठाेकून हाेते.


अाणखी तीन रस्त्यांवर माेहीम
पालिकेच्यावतीने शुक्रवारीदेखिल अतिक्रमण हटाव माेहीम राबवली जाणार अाहे. यात अाणखी तीन रस्त्यांचा समावेश करण्यात अाला अाहे. यात काेर्ट चाैक ते स्वातंत्र्य चाैक, स्वातंत्र्य चाैक ते पांडे डेअरी चाैक, टाॅवर ते शिवाजी नगर उड्डानपुल या रस्त्यांचे मार्कींग करण्याचे अादेश देण्यात अाले असून या मार्गावर कारवाई केली जाणार अाहे.


आयुक्तांनी हिंमत असेल तर खान्देश मिलमधील बांधकाम ताेडावे; अामदार भाेळे यांचे खुले आव्हान
प्रकरणात अार्थिक नाक दाबल्याने जिव्हारी लागल्यामुळे ही कारवाई केली जात अाहे. अायुक्तांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी खान्देश मिलच्या अावारातील विनापरवानगी सुरू असलेले बांधकाम थांबवावे, असे खुले अाव्हान अायुक्तांना दिले अाहे. भाजप कार्यालयात अायाेजित पत्रकार परिषदेत बाेलताना अामदार भाेळेंनी नियमानुसार अतिक्रमण कारवाई करण्यास हरकत नसल्याचे सांगितले; परंतु काेणतीही नाेटीस न देता चर्चा न करताच थेट कारवाईला विराेध दर्शवला अाहे. काेर्टाजवळील दुकाने पालिकेनेच बांधली हाेती. ती ताेडून उलट अार्थिक नुकसान केल्याचा अाराेपही केला. दुकानासमाेरील वेदर शेडचा अडथळा नसतानाही ते काढण्यात येत अाहेत. अतिक्रमण कारवाईत प्रशासन जरा अतिउत्साहीपणा दाखवत अाहे. ही कारवाई सत्ताधाऱ्यांच्या अादेशानुसार केली जात असल्याची दिशाभूल केली जात असल्याचे सांगितले. सतरा मजलीला परवानगी अाहे का? याची अाधी अायुक्तांनी खात्री करावी. अापण तरी नियमात असलेल्या जागेत बसलाेय का? हे तपासा. स्वत: अनधिकृत जागेत बसायचे अाणि लाेकांना त्रास द्यायचा याेग्य नाही. अायुक्तांचा बदलीसाठी खटाटाेप असून कारवाई करून हिराे हाेण्याचा हा प्रयत्न असल्याचे अामदार भाेळे म्हणाले. नियमाने काम केल्यास अाम्ही पाठीशी अाहाेत; परंतु नागरिकांना साेईसुविधा न देता केवळ अतिक्रमण कारवाई करून सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा अाराेप केला. या वेळी सभापती जितेंद्र मराठे, गटनेते भगत बालाणी, सरचिटणीस दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, राजेंद्र पाटील अादी उपस्थित हाेते.

अामदारांनी दिवाळीपर्यंत थांबायचे सांगितले हाेते
प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणासंदर्भात गेल्या दाेन महिन्यापांसून नियाेजन सुरू हाेते. पाेलिस बंदाेबस्तासाठी कारवाई लांबणीवर पडली हाेती. काेर्टाजवळील दुकानांची मुदत संपल्याने विषय संपला अाहे. त्या दुकानांची मुदत २०११ मध्येच संपली अाहे. गटारी बांधणे, अमृतची जलवाहिनी टाकण्याचे काम त्याच भागातून हाेणार अाहे. अामदारांनीच दिवाळीपर्यंत कारवाई करू नये, त्यानंतर बघा, असे सांगितले हाेते. प्रशासनासमाेर लहान माेठा असा भेदभाव नसून सगळेच सारखे अाहेत. सतरा मजलीसंदर्भात महासभेत ठराव केल्यास त्याचीही कारवाई करू. - चंद्रकांत डांगे, अायुक्त

माेठ्या अतिक्रमणांवरही हाताेडा
कोर्ट चौक ते घाणेकर चाैक तसेच सुभाष चौक या दरम्यान चौफेर कारवाई करण्यात आली. यात रस्त्यालगत छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी विनापरवानगी बांधलेले ओटे, पायऱ्या, शेड आणि इतर बांधकामे हटवण्यात आली. कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक, टाॅवरपर्यंत तसेच चौबे शाळेलगतचा परिसर, भीलपुरा परिसर, सुभाष चौक अादी ठिकाणी दुकानासमाेरील वेदरशेड देखिल काढण्यात अाले. लहान-माेठे अतिक्रमण असा कुठलाही भेदभाव कारवाईत झाला नाही.


प्रभाग ५ केंद्रबिंदू ठेवून कारवाई
माजी महापाैर नितीन लढ्ढा यांचे नेतृत्व असलेल्या प्रभाग पाचला केंद्रबिंदू ठेवून ही कारवाई सुरू असल्याचे लढ्ढा यांनी पत्रकात म्हटले अाहे. विकास कामांचे नियाेजन करताना सत्ताधारी हे शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभाग ५ व १५ ला सावत्र भूमिकेतून बघतात. अतिक्रमण काढताना प्रभाग पाचची निवड करत असल्याचे म्हटले अाहे. शहरभर अतिक्रमण वाढले असून विराेधी पक्षाचा जनाधार कमी व्हावा या हेतूने प्रशासनास हाताशी धरून कारवाई सुरू असल्याचे पत्रकात म्हटले.

अामदार भाेळे म्हणतात, अाधी सतरा मजलीचे अतिक्रमण ताेडा
भवानी पेठेतील एका धार्मिक स्थळाला लागून असलेल्या दुकानांचे वेदर शेड तसेच पाट्या काढण्याच्या कारणावरून काही विक्रेत्यांनी थेट अामदार सुरेश भाेळेंशी संपर्क केला. त्यानंतर भाेळे त्या ठिकाणी अाले. त्यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. अायुक्त दाेन दिवस राहतील. मात्र, तुम्हाला याच ठिकाणी राहायचे अाहे. अायुक्त ज्या सतरा मजलीत बसले त्याचे काही मजले अतिक्रमीत अाहेत. अाधी ते ताेडा मग लाेकांकडे फिरका. जनतेला सुविधा देण्याची बाेंबाबाेंब अाहे अाणि लाेकांना काय कायदा सांगतात? अशा शब्दात संताप व्यक्त केला. परंतु, अधिकाऱ्यांनी नियमानुसार कारवाई सुरू असल्याचे सांगितल्याने अामदार भाेळे त्या ठिकाणाहुन निघून गेले. दिवसभराच्या या माेहीमेत वाद-विवाद, विराेधाचे प्रसंग उद‌्भवले. प्रशासनाने मात्र, समन्वय ठेवून तणाव निर्माण हाेऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले.

जेसीबीवर चढून दुकानदाराने केला विराेध
न्यायालयाच्या भिंतीला लागून तत्कालिन नगरपालिकेने दुकाने बांधली हाेती. त्या दुकानांचा करार सन २०११ मध्ये संपुष्टात अाला हाेता. न्यायालयात झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार सुरक्षेच्यादृष्टीने अतिक्रमण काढण्याबाबत चर्चा झाली हाेती. त्यानंतर संबंधित दुकानदारांना नाेटीस बजावून सुचना देण्यात अाली हाेती. दरम्यान, दिवाळीपूर्वी करण्यात अालेले िनयाेजन दिवाळीनंतर राबवण्यात अाले. गुरुवारी सकाळीच काही दुकानदारांनी साहित्य काढून घेत दुकाने रिकामी केली हाेती. तर पालिका व पाेलिसांचा ताफा काेर्टाजवळ अाल्यानंतर दुकानदारांनी विराेध सुरू केला. या वेळी काही दुकानदार परिवारासह ठिय्या अांदाेलनात सहभागी झाले. व्यवसायाचे ठिकाण ताेडणार असल्याने अनेकांनी विनंती केली. दुकानदारांनी थेट जेसीबीसमाेर बसून विराेध सुरू केला. काही दुकानदारांनी जेसीबीला मिठी मारली. मात्र, पोलिस दलाने बळाचा वापर करत सर्व विरोधकांना हटवले. त्यानंतर या दुकानदारांनी आपाआपल्या रिकाम्या दुकानांमध्ये स्वत:ला कोंडून घेण्याचा प्रयत्न केला. येथून सुद्धा पोलिसांनी या दुकानदारांना हुसकावून लावले तर काहींना ताब्यात घेतले.Jalgoan Municipal Corporation take action against Encroachment

Post a comment

 
Top