0
संघाच्या मनात अाहेत नितीन गडकरीच.

या निवडणुकांपूर्वी, मात्र त्या निवडणुका मनात ठेवून योगी आदित्यनाथ यशस्वीपणे एक खेळी खेळले होते. बलराज मधोकांना न जमलेली खेळी! त्यांनी उद्धवजींना रामजन्मभूमीचा मुद्दा घेऊन अयोध्येत आणले होते. 'परफेक्ट इव्हेंट मॅनेजमेंट' म्हणजे काय हे दाखवत हा कार्यक्रम सिद्धीला नेला. उद्धव ठाकरे, आदित्यनाथ आणि संघ यांनी जवळजवळ एकाच वेळी एकाच सुरात 'न्यायालय नको, संसदेत कायदा हवा' अशी मागणी केली. हे मोदी आणि शहा यांना आव्हान होते का?

माझ्यासमोर बलराज मधोकांचे पत्र आहे. सविस्तर पत्र. धावत्या अक्षरात लिहिलेले. ते पत्रही त्यांनी विश्वासू माणसाबरोबर सीलबंद लिफाफ्यातून माझ्याकडे पाठवले नव्हते. मला बोलावून माझ्या हातात दिले होते. पत्राची तारीख आहे १६-६-२००१. या पत्रात बलराज मधोक यांनी त्यांच्या रणनीतीतील नवी खेळी माझ्यासमोर विश्वासाने ठेवली होती. त्यांचे म्हणणे होते, 'या वेळी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून ते उभे राहिले तर भाजपमध्ये उभी फूट पडेल. शिवसेनेने मधोकांना आपली मते देऊन त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरला तर हे नक्की होईल. मधोकांची मांडणी बरोबर होती. त्यात चूक एवढीच होती की, गाफीलपणे त्यांच्या सापळ्यात शिरण्याएवढा शिवसेनेचा वाघ भोळा नव्हता. हिंदुहृदयसम्राट असले तरीही कोणती खेळी केव्हा खेळावी, केव्हा टाळावी याचे असामान्य ज्ञान असलेले बाळासाहेब शिवसेनेचे सर्वेसर्वा होते. त्या वेळी आणखी एक मजेशीर गोष्ट आहे, मी नानाजी देशमुख आणि मधू लिमये यांचाही फार जवळचा मित्र आहे हे त्यांना माहीत होते. मात्र, माझ्याशी रणनीतीची चर्चा करताना मी ते बोलणे इतर कोणालाही बोलणार नाही असा त्यांचा विश्वास होता. माझ्याशी चर्चा करताना नानाजी, मधूजी यांचाही हाच विश्वास होता.

मी अजिबात बोललो नाही हे खरे, पण दिल्लीत गुप्त गोष्टी गुप्त राहत नाहीत. एक वेळ अफवा वाढवता वा संपवता येतात, मात्र गुप्त गोष्टी सर्वत्र आतल्या गोटात गुप्तपणे पोहोचलेल्या असतात. पुढील दोन दिवसांत नानाजींशी गप्पा मारत असताना अगदी सहजपणे नानाजी म्हणाले होते, 'सध्या सर्व पक्षातील सत्तेचे सिमेंट एवढे घट्ट आहे की राजकारण मंदावलंय' आणि विषय बदलून मधूजी म्हणाले होते, 'मधोक तसा मोठा माणूस, पण सध्या 'डिरेल' झालाय. भरकटल्यासारखा वागतोय.'

हे सारे आज आठवायचे कारण म्हणजे मला माझी दोन भाकिते आठवताहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचे अनपेक्षित निकाल बाहेर आले आणि त्याहीपेक्षा अनपेक्षितपणे आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मी लिहिले होते. 'आता मोदी जातील, आदित्यनाथ येतील.' त्यापूर्वी म्हणजे गोवा येथे अधिवेशन होऊन मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने जाहीर करण्याच्या दीड-दोन वर्षे आधी मुंबईला भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. शेवटच्या दिवशी अचानक मोदी अधिवेशनाला आले. व्यासपीठावर गेले आणि त्याच वेळी संजय जोशी अधिवेशनातून बाहेर पडले. त्याच दिवशी रात्री निखिल वागळेंनी मला सातारहून 'आजचा सवाल' या चर्चेत सहभागी केले होते. चर्चेत मी मांडलेले मत कुणालाच पटले नव्हते. पण मी ठामपणे सांगितले होते, 'याचा अर्थ आता अडवाणी बाहेर फेकले जातील आणि मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील.'

ते असो, आज काय? निवडणुकांचे निकाल बाहेर आलेत. या निवडणुकांपूर्वी मात्र त्या निवडणुका मनात ठेवून योगी आदित्यनाथ यशस्वीपणे एक खेळी खेळले होते. मधोकांना न जमलेली खेळी! त्यांनी उद्धवजींना रामजन्मभूमीचा मुद्दा घेऊन अयोध्येत आणले होते. 'परफेक्ट इव्हेंट मॅनेजमेंट' म्हणजे काय हे दाखवत हा कार्यक्रम सिद्धीला नेला. उद्धव ठाकरे, आदित्यनाथ आणि संघ यांनी जवळजवळ एकाच वेळी एकाच सुरात 'न्यायालय नको, संसदेत कायदा हवा' अशी मागणी केली. हे मोदी आणि शहा यांना आव्हान होते का? मधोकांना वाटत होते. त्याप्रमाणे किमान हिंदी भाषिक खासदारांत, किमान मनात दुफळी होईल, असा अंदाज होता का? आता योग्य वेळी पंतप्रधान म्हणून मोदी नकोत आदित्यनाथ हवेत, असा पहिला आवाज उद्धव ठाकरे उठवतील असे काही गृहीत होते का?

अजूनही हे गृहीत आहेच. पण आता निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. परिस्थिती थोडी मजेशीरपणे बदललेली आहे. या निवडणुकीत मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही ठिकाणी प्रचाराची धुरा प्रामुख्याने योगी आदित्यनाथ यांनी सांभाळली होती. निकाल वरवर पाहता गोंधळाचे वाटतात. पण ते तेवढे गोंधळाचे नाहीत. राजस्थानात भाजप हरेल हे गृहीत होते. खरे तर फरक जास्त असेल असा अंदाज होता. पण तो फरक कमी झालाय. मध्य प्रदेशात मात्र भाजपला निसटता विजय मिळेल, असे वाटत होते. पण विजय त्यांच्या हातातून निसटला. म्हणजे म्हटले तर राजस्थानात जागा कल्पनेपेक्षा जास्त वाढल्या. त्याचे कारण आदित्यनाथ असे त्यांचे समर्थक म्हणू शकतात, म्हणताहेत पण. मोदी-शहांना मध्य प्रदेशात पुसटता विजय हवा होता. -आदित्यनाथांमुळे जागा कमी असे सांगत पुन्हा आपली माणसे सत्तेवर आणण्यासाठी. त्यांचे गणित चुकले म्हणजे पुन्हा जय आदित्यनाथांच्याच कुटिल नीतीचा! त्या दोघांच्या आतल्या वर्तुळातील मंडळींची चर्चा फार मजेशीर आहे. गोंधळलेली पण बाहेर 'मया जीतम्' म्हणून सांगणारी! खरेतर संघाच्या मनात प्रथमपासून गडकरी आहेत. अडचण एकच -वीर सावरकरांनी गुरू गोळवलकरांना सांगितलेली, जी संघाचे महाराष्ट्र विभागप्रमुख दामुअण्णा दातेंनी त्यांच्या 'स्मरणशिल्पे' या पुस्तकात सांगितली आहे. सावरकरांनी गुरुजींना सांगितले, 'राजकीय पक्षात निर्माण होणाऱ्या ताकदीची तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही असाल तोवर जनसंघ तुमचे ऐकेल.' आणि ते खरेच होते. मौलिचंद्र शर्मा, वसंतराव ओक, बलराज मधोक यांना गुरुजींनी पालापाचोळ्याप्रमाणे बाहेर फेकले. 'मात्र तुमच्या ताकदीचा सरसंघचालक नसेल तर 'अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी' म्हणून संघ जनसंघामागे फरपटत जाईल,' असेही सांगितले होते. आजही परिस्थिती भागवत बदलून दाखवू शकतील? त्यांच्या आणि संघाच्या मनात खूप काळापासून नितीन गडकरी आहेत आणि हा तिढा सोडवण्यासाठी नितीन गडकरींचे नाव सहजपणे पुढे येऊ शकते.

ते असो, प्रश्न वेगळा आहे. या निवडणुकींच्या नंतर विरोधी पक्ष भलताच समाधानी आहे. 'दगडापेक्षा वीट मऊ' म्हणून तो परिवर्तनवादी शक्तींना पण आपला वाटतोय! त्या विरोधी पक्षासमोर दोन प्रमुख आव्हाने आहेत. एक राम जन्मभूमीचे, दुसरे ईव्हीएम मशीनचे. रामजन्मभूमीचे आव्हान स्वीकारायचे असेल तर मंदिर शंबुकाचे हवे आणि त्याचा आकार एकलव्याच्या अंगठ्याचा हवा अशी काही कणखर भूमिका परिवर्तनवादी दलितांना आणि ओबीसींना घ्यावी लागेल.

ईव्हीएम मशीन हे शेवटी एक इलेक्ट्रॉनिक्स खेळणे आहे. ते हवे तसे फिरवणे कठीण असले तरी अशक्य नाही. नव्या रचना मांडत विरोधी पक्षांना पुढे यावे लागेल. अनेक उपाय आहेत. या ईव्हीएम मशीनमध्येच मतपत्रिका पण असतील. आपण ज्या वेळी बटण दाबू त्याच वेळी आतील मतपत्रिकेवर त्याच चिन्हावर तुमचा शिक्का पडेल. ती मतपत्रिका यंत्रातून बाहेर येईल. शिक्का त्याच चिन्हावर पडलाय याची खात्री करून ती मतपत्रिका तुम्ही तेथील मतपेटीत टाकाल. मतमोजणी दोन्ही ठिकाणी होईल आणि यंत्रात घोटाळा केलेला नसेल तर त्यात फरक नसेल. या निवडणुकांच्या नंतर आव्हाने वाढलीत ती मोदी, आदित्यनाथ विरोधी पक्ष आणि गडकरी यांच्यासमोरील!
Now Adityanath, after that Modi or Gadkari? special article by Dattaprasad Dabholkar

Post a comment

 
Top