0
नागपूर - टी-१ ऊर्फ अवनी वाघिणीला स्वसंरक्षणार्थ गोळ्या घालून ठार मारण्याच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह लावताना या घटनेचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या समितीने वाघिणीला ठार मारणारा खासगी शूटर असगर अली खान आणि वन विभागाच्या पथकावर कायद्याचे पालन न केल्याचा गंभीर ठपका ठेवला आहे. वाघिणीला बेशुद्धीचे 'डार्ट' मारल्यानंतर पथकाने औषधांचा प्रभाव होण्याची कुठलीही प्रतीक्षा न करता काही सेकंदातच तिला गोळ्या घातल्या. 'डार्ट'मधील औषध २४ तासांहून अधिक काळासाठी वापरले जात नाही. तरीही ५६ तासांपूर्वी औषध भरलेले डार्ट वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी वापरले गेले होते, अशी धक्कादायक माहिती समितीच्या अहवालातून उघड झाली आहे.
अवनी वाघिणीला २ नोव्हेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील बोराटी येथील जंगलात गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. या घटनेमुळे वन्यप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होऊन जागतिक पातळीवरही या घटनेचा निषेध केला गेला. वाघिणीला शक्यतोवर बेशुद्ध करण्याचे व आकस्मिक परिस्थितीतच ठार मारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने सेवानिवृत्त सहायक प्रधान मुख्य वनसंरक्षक ओ. पी. कालेर आणि वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य जोस लुईस या दोघांची चौकशी समिती नेमली होती. समितीच्या अहवालात अवनीला ठार मारण्याच्या हेतूवरच थेट प्रश्नचिन्ह लावले आहे.
स्वसंरक्षणासाठी वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय त्यावेळी घ्यावा लागला, हा खासगी शूटर असगर अली खान याचा दावा खोडून काढताना अहवालात या पथकाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. वन विभागाचा कर्मचारी मुखबीर शेख याच्याकडे केवळ वाघिणीचा शोध घेऊन तिची ओळख पटवण्याची जबाबदारी होती. मात्र, त्याने वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी स्वत:च 'डार्ट' चा वापर केला. संपूर्ण दिवसात शूटर असगर अली खान याने डार्ट हातीही घेतले नव्हते. डार्ट मध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधाचा प्रभाव २४ तासांच्या वर टिकत नाही, अशा सूचना पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिल्या असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करून ५६ तासांपूर्वी औषध भरलेला डार्ट यासाठी वापरला गेला.

Post a Comment

 
Top