0
 • Butterfly name will changeनागपूर -ब्रिटिशांनी फुलपाखरांना देऊन ठेवलेली व तेव्हापासून तीच ओळख बनलेली नावे आता बदलणार आहेत. महाराष्ट्रातील फुलपाखरांना आता मराठमोळी नावे दिली जाणार आहेत. महाराष्ट्रात फुलपाखरांच्या सुमारे २५७ प्रजाती आहेत. राज्यातील फुलपाखरांना मराठी नावे मिळावीत यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने एक समिती स्थापन केल्याची माहिती मंडळाचे सदस्य जयंत वडतकर यांनी 'दिव्य मराठी'ला दिली. येत्या सोमवार, १० डिसेंबर रोजी समितीची पहिली बैठक पुणे येथे आयोजित करण्यात अाली आहे.
  राज्यात प्रत्येक प्राणी आणि पक्ष्याला प्रदेशपरत्वे वेगवेगळी नावे आहेत. प्रदेशानुसार प्रत्येकाची वेगळी ओळख आहे. पण फुलपाखरांची मराठी नावे अपवादानेच आढळतात. त्यामुळेच फुलपाखरांना मराठी नावे ठेवण्याची संकल्पना पुढे आली, असे वडतकर म्हणाले. सुप्रसिद्ध फुलपाखरू अभ्यासक डाॅ. विलास बर्डेकर समितीचे अध्यक्ष आहेत, तर वडतकर यांच्यासह हेमंत ओगले, दिवाकर ठोंबरे व बीएनएचएसचे डाॅ. राजू कसंबे सदस्य आहेत. समितीला कोणतीही कालमर्यादा दिलेली नसली तरी शक्य तितक्या लवकर मराठी नावे शोधून देण्याची अपेक्षा आहे.
  पूर्वी घरोघरी परसबाग असायची. त्यात विविध प्रकारची फुलझाडे राहत असे. अलीकडे आंगण असलेली घरे जाऊन गगनचुंबी इमारती आल्यामुळे फुलझाडे लावायला जागाच राहिली नाही. सार्वजनिक उद्यानांमध्येही कटाईच्या नावावर ही राेपटी उपटून फेकण्यात येतात. टेरेस गार्डनवर एकतर भाजीपाला घेण्यात येतो नाहीतर फुलझाडे लावली जातात. याचा प्रतिकूल परिणाम फुलपाखरांवर होत असल्याचे वडतकर म्हणाले.
  म्हणून फुलपाखरांना इंग्रजी नावे 
  ब्रिटिशांनी पहिल्यांदा फुलपाखरांवर अभ्यास करून प्रजातींचा शोध लावला म्हणून त्यांनी फुलपाखरांना काॅमन इंग्लिश नावे दिली, अशी माहिती ख्यातनाम फुलपाखरू संशोधक व सेलू येथील िवद्याभारती महाविद्यालयातील प्राणिशास्त्र िवभागप्रमुख डाॅ. आशिष टिपले यांनी दिली. डाॅ. आशिष टिपले िवदर्भ, महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेशात संशोधन करून फुलपाखरांचे डॉक्युमेंटेशन केले आहे. फुलपाखरांना शास्त्रीय नावे असतात. पण ब्रिटिशांनी सर्वप्रथम संशोधन सुरू केल्यामुळे काॅमन रोझ, लेपर्ड, ब्ल्यू टायगर, सार्जंट, कमांडर, वंडरर, जोकर अशी नावे दिल्याचे टिपले यांनी सांगितले.
  िवदर्भात १६७ विविधरंगी प्रजाती 
  िवदर्भात फुलपाखरांच्या विविधरंगी १६७ प्रजाती असून त्यातील १७ अधिसूचित म्हणजे संरक्षित आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरात फुलपाखरांच्या विविधरंगी ११७ प्रजाती असून त्यातील ०७ अधिसूचित म्हणजे संरक्षित आहेत. महाराष्ट्रातील २५७ प्रजातींपैकी २५ अधिसूचित आहेत. नागपूर शहरात १४५ प्रजाती असून त्यातील १४ अधिसूचित आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रजाती पश्चिम घाटात आहेत.
  अशी असतील मराठी नावे 
  - अॅनोमॅलस िवसंगत नरेश 
  - डैनीड एग फ्लाय श्वेत ठिपके 
  - सिल्व्हर लाइन लांब चंद्ररेखा 
  - रेड ब्रेस्ट जेझबेल लाल वक्ष स्वैरिणी 
  - गोल्डन सॅप्फिरी सुवर्णकाशी 
  - पर्पल सॅफ्फिरी जांभूळकाशी 
  - डार्क सॅफ्फिरी गडदकाशी 
  - एव्हनिंग ब्राऊन तपकिरी संध्या

Post a Comment

 
Top