येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेत 3 कोटी 30 लाख 37 हजार 81 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ऍड. मुकुंद सारडा यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल झाल्याने साताऱयात खळबळ उडाली आहे. संशयित सर्वजण हे पतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी असून 2010 ते 2016 या कालावधीतील हा अपहार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या बाराही संचालकांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतला असून दि. 12 डिसेंबर रोजी त्याची पुढील सुनावणी आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2010 ते 2016 या कालावधीत महेश नागरी पतसंस्थेमध्ये संशयितांनी आपआपसात संगनमत करुन 3 कोटी, 30 लाख 37 हजार 81 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याबाबतचा लेखाजोखा झाल्यानंतर याप्रकरणी तक्रारदार राणी शिवाजीराव घायताडे या लेखापरीक्षकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली.
याप्रकरणी मकुंद सारडा (वय 60, रा.भवानी पेठ), सुभाष लोया (वय 60, रा. लोखंडे कॉलनी), शिरीष पालकर (वय 53, रा.भवानी पेठ), सुनील राठी (वय 62, रा. सोमवार पेठ), राहूल गुगळे (वय 51, रा. प्रतापगंज पेठ), रविंद्र जाजू (वय 61, रा. शनिवार पेठ), नीलेश लाहोटी (वय 45, रा. प्रतापगंज पेठ), धिरज कासट (वय 33, रा. भवानी पेठ), सुरेश सारडा (वय 55, रा. भवानी पेठ), सुरेश भरमे (वय 65, रा.सोमवार पेठ), राजेश्री लाहोटी (वय 55, रा. भवानी पेठ), पद्मा कासट (वय 25, रा.भवानी पेठ), हेमंत कुलकर्णी (रा.शनिवार पेठ) या संशयितांवर गुन्हा दाखल झालेला आहे.
संशयितांनी संबंधित रकमेचा अपहार करुन अपहारीत रकमेच्या वसुलीबाबत जाणूनबुजून टाळाटाळ करुन हलगर्जीपणा केला आहे. पतसंस्थेच्या पदाधिकाऱयांचे हे कृत्य बेजबाबदार आहे. संशयितांनी आपआपसात हितसंबंध प्रस्थापित करुन अपहार दडपण्याच्या उद्देशाने संगनमताने सभासद, ठेवीदार व सहकार खाते, शासनाची फसवणूक केली आहे. तसेच ठेवीदारांचे नुकसान केले असल्याचेही तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे. फौजदार नसीम फरास हे पुढील तपास करत आहेत.

Post a Comment