0
तो पाकिस्तानातल्या ज्या मुलीवर प्रेम करत होता, तिनेही त्याला फसवलं.
Love crosses the boundaries!

मैत्री, बंधुभाव, प्रेम या नि:संशय निखळ, प्रामाणिक भावना. माणूस म्हणून जगताना यावर विसंबून राहावं लागतं. हमीद अन्सारीला इंटरनेटने फसवले. तो पाकिस्तानातल्या ज्या मुलीवर प्रेम करत होता, तिनेही त्याला फसवलं. हमीदच्या मित्रांनी त्याला अफगाणिस्तानातून पाकिस्तानात अवैधरित्या जाऊन आपले प्रेम व्यक्त करण्याचा सल्ला दिला, या सल्लावर त्याने आंधळा विश्वास ठेवला. सॉफ्टवेअर इंजिनिअरमधील पदवीधर असलेला पण भोळाभाबडा हमीद पासपोर्ट, व्हिसाविना पेशावरपर्यंत पोहचला परंतु, तेथे प्रेम नव्हे तर पोलिसांची हातकडी त्याची वाट पाहात होती. पाकिस्तानी न्यायालयाने भारतीय गुप्तहेर असल्याच्या संशयावरून त्याला सहा वर्षे तुरुंगवास ठोठावला. दरम्यान, अनेक राजनैतिक वाटाघाटीनंतर तसेच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मदतीने तो वाघा सरहद्दीवरून भारतात आला तेव्हा त्याच्या अश्रूंना बांध फुटला. आपल्या देशाच्या सीमेत प्रवेश केल्यानंतर ही जमीन, हा देश आपला असल्याची अव्यक्त जाणीव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. डोळ्यात अश्रू व सुटकेमुळे चेहऱ्यावर अपार, ओसंडून वाहत असलेला आनंद अशा अवस्थेत हमीदने आपल्या आई-वडील-भावाला घट्ट मिठी मारली, ती पुन्हा अशी चूक करणार नाही अशी मनाशी खूणगाठ बांधत. पाकिस्तानात जाऊन प्रेम शोधणे ही माझी चूक होती असे हमीद म्हणाला. पण परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्याच्या मनात तशी भावना निर्माण होऊ न देण्याची खबरदारी घेतली. त्यांनी उलट त्याच्या प्रेमभावनांना, त्याच्यातील निरागसतेला समजून घेतले. त्याच्या प्रामाणिक-पारदर्शी भावनेचे कौतुक त्यांनी केले. ‘तुला नियतीने तिकडे (पाकिस्तानात) नेले त्यात दु:खी होण्याचे, लाज वाटण्याचे कारण नाही,’ अशा शब्दांत त्यांनी खचलेल्या हमीदला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

चांगल्या मनाची लोकं या बनेल जगात जगू शकत नाहीत, असा या एकूण प्रकरणाचा निष्कर्ष कोणी काढू शकतो पण ते तसे नाही. उलट धर्म व संस्कृती यांच्यामुळे दुरावलेली माणसं केवळ प्रेमभावनेने एकत्र येऊ शकतात हे पुन्हा पुन्हा अधोरेखित करणारी ही घटना आहे. भारत-पाकिस्तानमध्ये कितीही तणाव वा युद्धसदृश्य वातावरण निर्माण झाले तरी दोन्ही देशांमध्ये शतकानुशतके जो अतूट व अदृश्य सांस्कृतिक धागा आहे त्या धाग्याला आजपर्यंत झालेली तीनचार युद्धे, दहशतवाद तोडू शकलेले नाही, हेही यातून दिसून आले. एका हमीदची प्रेमप्रकरणात फसवणूक झाली; पण दोन्ही देशांमध्ये अशी अनेक प्रेमप्रकरणे आहेत ती यशस्वीही झालेली आहेत. हमीदच्या प्रकरणातून एक लक्षात घ्यायला हवे की दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाच्या परिस्थितीतही भारतीय परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी, जतीन देसाई यांच्यासारख्या भारत-पाक मैत्रीचा आग्रह धरणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्याने आपली सर्व शक्ती पणास लावत हमीदच्या प्रेमातला निरासगपणा पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना पटवून दिला. पाकिस्ताननेही हमीद मुस्लिम असूनही त्याच्यावर हेरगिरीचा संशय व्यक्त केला, त्याला तुरुंगात धाडले पण जेव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी त्याची सुटका करण्याचे औदार्यही दाखवले. कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात पाकिस्तानची अडेलतट्टूची भूमिका आजही कायम आहे पण या प्रकरणात पाकिस्तानच्या व्यवस्थेने हमीदचे निष्पापपण, त्याची प्रामाणिक प्रेमभावना त्यांच्याकडील मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकारांकडून समजून घेतली. अमृतसर-कर्तारपूर कॉरिडोरच्या कार्यक्रमात काही भारतीय पत्रकारांनी, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कानावर हमीदचे प्रकरण घातले. त्यानंतर महिनाभरात सर्व यंत्रणा भराभर कामाला लागली व हमीदची सुटका झाली.

या घडीला हमीदचे प्रकरण भारत-पाकिस्तानच्या व्यवस्थांनी समजून घेतले पाहिजे. त्याचबरोबर दोन्ही देशांतील कट्टरवादी संघटनांनीही या घटनेकडे माणुसकीच्या नजरेतून पाहिले पाहिजे. अनेक वर्षाची कटुता, संशय, मत्सर, घृणा यांवर दोन्ही देशात राजकारण करण्याचा धंदा सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धर्माच्या आधारावर डोकी भडकावली जात आहेत. सरकारविरोधी भूमिका मांडणाऱ्यांना थेट पाकिस्तानात जाण्याचे फर्मान सुनावले जाते. अशा कठीण परिस्थितीत हमीद प्रकरणाने माणुसकी, सद्भावना, बंधुभाव शिल्लक असल्याचा आशावाद दाखवून दिला आहे. आजच्या घडीला भारत-पाकमधील तुरुंगात सीमेचे उल्लंघन केल्याने शेकडो मच्छिमार, हेरगिरी व दहशतवादाच्या संशयावरून अटक केलेले अनेक नागरिक आहेत. त्यांच्या सुटकेसाठी दोन्ही देशांच्या यंत्रणांना एकमेकांशी झगडावे लागते. यात न्यायालयीन लढे, राजनयिक दबाव व घरातले राजकारण अशी चाळण आहेच.शिवाय प्रत्येकाचा निष्पापपणा, मानवी चूक कागदावर सिद्ध करावी लागते. हे अडथळे थोडे जरी कमी केले तरी उभय देशांमधील संशय निवळेल. सुसंवादाची दारे उघडी होतील. हमीदची प्रेमकहाणी असफल झाली असली तरी शत्रूवरही मनापासून प्रेम करता येते हे तरी या निमित्ताने पुढे आले, तेच महत्त्वाचे आहे.

Post a Comment

 
Top