0
काँग्रेसने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीही स्वीकारल्या नाहीत

अलाहाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी रायबरेली व अलाहाबादमध्ये काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेसने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची दुर्दशा झाली. रालाेआने शिफारसी स्वीकारून उत्पादनाला किमान हमी भाव दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. २२ रब्बी व खरीप पिकांसाठी हमीभाव लागू आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना ६० हजार कोटी रुपयांचा लाभ होणार आहे, असे माेदींनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, काँग्रेसने कर्नाटकात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. वास्तविक काँग्रेस-जनता दल(धर्मनिरपेक्ष) सरकार सत्तेवर येऊन सहा महिने लोटली. परंतु कर्जमाफी झालीच नाही. उलट शेतकऱ्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाले आहेत. लालगंज येथील रेल्वे कोच कारखाना परिसरात आयोजित सभेत रविवारी मोदी बोलत होते. मोदींनी रायबरेलीला ११ हजार कोटी रुपयांची भेट दिली. देशात परिवर्तन होत आहे. प्रयागराज कुंभानंतर देशात हा बदल दिसून येईल, असा दावाही मोदींनी केला.

निवडणूक :
कर्जमाफीचे आश्वासन देऊन भाजप, काँग्रेस दोन्ही राज्यांत विजयी, शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर कायम रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार कर्जमाफीचा वाईट परिणाम बँकांवर पडतो. असे असले तरी कर्जमाफीवरून होणारे राजकारण काही थांबलेले नाही. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये निवडणुकीदरम्यान कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत राहिला. यापूर्वी निवडणुकीत महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी, उत्तर प्रदेशात ३६ हजार कोटी, काँग्रेसने पंजाबमध्ये १० हजार कोटी व कर्नाटकात ८ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. परंतु शेतकऱ्यांवर अद्यापही कर्जाचा डोंगर तसाच आहे. कर्जमाफीसाठी सरकारकडे अतिरिक्त दोन लाख २० हजार कोटींची गरज आहे.

हमीभाव : ४ वर्षांत फक्त अडीच हजार रुपयांनी उत्पन्न वाढले'
नाबार्डच्या पाहणीनुसार गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २५०५ रुपयांची वाढ झाली आहे. ग्रामीण भागात राहणारे ४१ टक्के कुटुंब कर्जात बुडाले. त्यापैकी ४३ टक्के शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. २०१६-१७ मध्ये शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न सरासरी ८ हजार ९३१ रुपये तर २०१२-१३ सरासरी ६ हजार ४२६ रुपये होते.

Post a comment

 
Top