रजेचे अर्ज स्वत:जवळ ठेवणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांना बजावली कारणे दाखवा नोटीस
नाशिक- सध्या सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीतही महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शनिवारी (दि. २९) सकाळी सव्वासहालाच हजेरी शेडवर उपस्थित राहून कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या रजेचे अर्ज विभागीय अधिकाऱ्यांकडे जमा करण्याएेवजी स्वत:कडे ठेवणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. प्रत्यक्ष हजेरी शेडवर जाऊन आयुक्तांनी हजेरी घेणे ही पालिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
स्वच्छ भारत अभियानात नाशिकचा अव्वल क्रमांक यावा या उद्देशाने आयुक्त गमे यानी विभागीय अधिकाऱ्यांना सकाळी सहाला हजेरी शेडवर व त्यानंतर भागात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विभागीय अधिकारी तपासणी करीत आहेत. यातच पालिका आयुक्तांनी पूर्वसूचना न देता शनिवारी सकाळी पूर्व विभागातील मुंबईनाका व पंचवटी विभागातील हजेरी शेडवर जाऊन तपासणी केली. यावेळी काही कर्मचारी गैरहजर अाढळले.
चौकशी केली असता त्यांनी रजेचा अर्ज दिल्याचे निष्पन्न झाले. मात्र ते अर्ज विभागीय अधिकाऱ्यांकडे न देता स्वच्छता निरीक्षक पी. डी. मारू यांनी स्वत:कडेच ठेवले होते. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच बऱ्याच दिवसांपासून गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची रजा लावून त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी अहवाल पाठविण्याचे आदेश दिले. यावेळी घनकचरा विभागाचे उपायुक्त डाॅ. सचिन हिरे, विभागीय अधिकारी जयश्री साेनवणे व राजेंद्र गाेसावी हजर हाेते.

Post a Comment