0
स्टाइल अँड ट्रेंड उत्कृष्ट फॅब्रिकच्या विविधरंगी अबाया, हिजाब, मखनीला पसंती

औरंगाबाद- मुस्लिम समाजातील महिलांमध्ये पडद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पडदा हा बुरखा, हिजाब, रिदा अशा विविध नावांनी ओळखला जातो. कालानुरूप त्यात असंख्य बदलही झाले आहेत. फॅशनबाबत सजग मुस्लिम तरुणींनी हे बदल स्वीकारतानाच परंपरेचे पालन करण्याचे भानही ठेवले आहे. इराण, इराक, इजिप्त अन् दुबईच्या अबाया, हिजाबने शहरातील बाजारपेठ सजली असून उत्कृष्ट फॅब्रिकच्या विविधरंगी अबाया, हिजाब, मखनीला पसंती मिळत आहे. हिजाबमध्ये नवीन ट्रेंड आला आहे. विविध रंगांतील अबाया आणि हिजाब मुली व महिलांसाठी संस्कृतीसोबतच स्टाइल स्टेटमेंट बनत आहेत. मुलींमध्ये हिजाबची क्रेझ असून बाजारात इराण, इराक, इजिप्त आणि दुबईच्या अबाया व हिजाब अनेक व्हरायटीत उपलब्ध असल्याचे हिजाब विक्रेते मोहंमद वसीम यांनी सांगितले.

मुलींचा कल मॅचिंग हिजाब वापरण्याकडे 
काळ्या अन् गडद रंगांच्या साध्या कपड्याच्या हिजाबची जागा आता उत्कृष्ट फॅब्रिकपासून बनलेल्या रंगीत हिजाबने घेतली आहे. शिफाॅन, जॉर्जेट, मिक्स कॉटन, इंडियन फॅब्रिक्सपासून ट्रेंडी कलर्समध्ये हिजाब तयार होत आहे. स्कार्फ लूक हिजाबला तरुणींची पसंती आहे. अनेक मुली, महिला पूर्ण अबाया न घालता हिजाबचा वापर करत आहेत. यातील कॅपसारखा आकार असणाऱ्या स्कार्फला मखनी म्हटले जाते. ड्रेसनुसार मॅचिंग हिजाब वापरण्याकडे सध्या मुलींचा कल आहे. कॅमल हंबर, फॅन्सी कॅप्स असलेले हिजाब किंवा मखनीही वापरल्या जात आहेत. महाविद्यालयीन तरुणी अंडर कॅप, बँड, बोनट कॅप, जुडा कॅपसारखे हिजाब वापरत आहेत.

का वापरला जातो हिजाब? 
हिजाब ही मुस्लिम धर्मातील धार्मिक व पारंपरिक वेशभूषा आहे. पुरुषी नजरेपासून स्त्रीचे संरक्षण हा हेतू हिजाबमागे आहे. पडद्याला अरबी व फार्शी भाषेत हिजाब म्हटले जाते. भारतात त्यास बुरखा म्हणतात. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवणाऱ्या जगभरातील मुस्लिम महिला हिजाब परिधान करून जबाबदारी पार पाडत आहेत.

असे होते आधी बुरख्याचे स्वरूप 
भारतात साध्या कपड्याचे काळ्या रंगाचे बुरखे पूर्वापारपासून वापरले जात आहेत. डोक्यापासून पायापर्यंतचा भाग पूर्णपणे झाकणाऱ्या बुरख्याच्या डोळ्यांजवळ पातळ जाळी असते. कालांतराने नकाब असलेले, छत्रीसारखे हिजाब असलेले बुरखे वापरले जाऊ लागले. सिंगल किंवा डबल नकाब असलेले हिजाब वापरत होते. सध्या विविध रंगांतील हिजाब बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

दर ८०-३५० रुपयांपर्यंत 
विविध फॅब्रिक, रंगातील मखनी, हिजाबचे दर १५० ते ३५० रुपयांपर्यंत आहेत, तर स्टोलमध्ये ८० ते ३५० रुपयांपर्यंत रेंज उपलब्ध आहे. कपड्याचे डिझाइन व दर्जानुसार दर आहे.Iran, Iraq, Egypt and Dubai's Abaya, Hijab avilable in Market

Post a comment

 
Top