तिवसा येथील शिक्षक कॉलनीस्थित असलेल्या एटीएम फोडण्यासाठी शहरातली अलीम करीम शहा (वय २१, रा. वॉर्ड क्रमांक ३) याने अॅन्ड्रॉईड मोबाइलवर युट्यूबच्या माधम्यातून एटीएम फोडण्याचा अभ्यास केला. झटपट श्रीमंत होण्यासाठी अँड्रॉइड मोबाइलवरील यू ट्यूबचा आधार घेतला. एटीएम फोडण्याची कला त्याने यू ट्यूबवरील गुन्हेगारी दुनियेतील व्हिडिओ पाहून अवगत केली. पोलिस तपासात त्याने घटनेची कबुली दिली. त्यानंतर शुक्रवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास त्याने एटीएम फोडले. सध्या सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. या थंडीमुळे रात्री-मध्यरात्री घराबाहेर कुणीच राहणार नसल्याचा फायदा घेत अलीमने मध्यरात्रीनंतर अॅक्सिस बँकेचे एटीएम गाठले. त्यासाठी जे साहित्य पाहिजे,ते सुद्धा त्याने यू ट्यूबच्या माध्यमातून गोळा केले व सोबत नेले होते.त्यानंतर एटीएम मशीनच्या खालच्या बाजूला जेथे रोकड ठेवली असते अशा ठिकाणचा भाग त्याने गॅस कटरच्या साहाय्याने कापण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र यातच दीड तास उलटून गेला. मात्र एटीएम मशीन फोडण्यात त्याला यश आले नाही. अखेर त्याने कुणाला आपण दिसण्याच्या आत तेथून साहित्य घेऊन पळ काढला. तिवसा-सातरगाव रोडवरील आनंदवाडी येथील कॅनॉलच्या बाजूला त्याने हे साहित्य एका झुडपात लपून ठेवले होते. काही जणांना तो तेथे संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आले. एकीकडे एटीएम फोडण्यात आल्याच्या घटनेचा पोलिसांचा तपास सुरु असताना यातच आरोपी अलीम करीम शहा हा कॅनॉल जवळ फिरकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यावर पाळत ठेवली व काही साहित्यासह त्याला तेथेच घटनेच्या काही तासातच रंगेहाथ अटक केली.
त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने आपणच एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्याची कबुली पोलिसांना दिली. अलीम करीम शहाकडून विना क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी, अड्रॉइड मोबाइल व काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ डिसेंबरला त्याला अटक केल्यानंतर तिवसा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश व्ही. एन. गिरवलकर यांनी अलीमला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा तपास पोलिस अधीक्षक दिलीप झळके व अप्पर पोलिस अधीक्षक एम एम मकानदार,उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक सुनील किनगे तसेच तिवसा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव,पीएसआय आशीष बोरकर,संतोष तेलंग,धनंजय झटाले, विनायक गावंडे,मिनेश खांडेकर,मोहसीन शहा तर स्थानिक गुन्हे शाखेचे मूलचंद भांबुरकर,अमित वानखडे,संदीप लेकुरवाळे यांनी केला.

Post a Comment