भिवंडी तालुक्यातील आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गोदाम पट्ट्यात आगीच्या घटना ताज्या असतानाच भिवंडी कल्याण रस्त्यावरील सरवली एमआयडीसी येथील उजागर प्रिंटिंग अॅण्ड प्रोसेसिंग या डाईंग कंपनीस सोमवारी पहाटे ०५. ३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीची तीन माजली इमारत व तेथील यंत्रसामुग्री व कच्चा व तयार कपडा असा कोट्यवधी रुपयांचा माल जाळून खाक झाला आहे. भिवंडी, कल्याण, ठाणे, एमआयडीसी येथील अग्निशामक दलाच्या गाड्यांची घटनास्थळी धाव घेत ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. पहाटेच्यावेळी कंपनी बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसून बंद कंपनीत आग लागली कशी हा प्रश्न उपस्थित होत आहे. एका तासाने या घटनेची माहिती स्थानिक कोनगाव पोलिस स्टेशनने भिवंडी व कल्याण अग्निशमन दलास दिली. त्यानंतर दिड ते दोन तासांनी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. तोपर्यंत तळमजल्यावर लागलेल्या आगीने उग्र रूप धारण करीत आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण तीन माजली इमारत वेढली गेली. वरच्या मजल्या पर्यंत पाणी मारणे अडचणीचे ठरत असल्याने संपूर्ण परिसर धुरांच्या लाटांनी वेढला गेला होत. सुदैवा म्हणजे स्थानिक कंपनींमधून पाण्याची उपलब्धता होत असल्याने या आगीवर सतत पाण्याचा मारा करून आटोक्यात ठेवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. तरीही आग पूर्णतः आटोक्यात आणण्यास सुमारे पाच ते सात तासाचा वेळ लागणार असल्याची माहिती अग्निशामक दलाचे कल्याण येथील अधिकारी चौधरी यांनी दिली आहे.
पहाटेच्या वेळी जेव्हा कंपनीत आग लागण्याची घटना घडली त्यावेळी कंपनी बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बंद कंपनीत आग लागली कशी हा प्रश्न उपस्थित होत आहे. ही आग लागली का लावली गेली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या आगीची धग इतर कंपन्यां पोहचू न देण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी कसोशीने प्रयत्न करून मोठे नुकसान टाळले आहे .

Post a Comment