गावातील कुणाला याची माहिती होऊ नये म्हणून तांड्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील झोपडीतून गांजाची विक्री करायचा.
- जालना- कुणाला दिसू नये अथवा ओळखू येऊ नये म्हणून पावसाळ्याच्या हिरवळीत गांजाची झाडे लावायची. नंतर त्या झाडांमधून गांजा तयार करून तो विक्री करायचा. गावातील कुणाला याची माहिती होऊ नये म्हणून तांड्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील झोपडीतून ओळखीच्या ठोक खरेदीदारांना गांजाची विक्री करण्याचा प्रकार जालना तालुक्यातील बाजीउम्रद तांडा येथे उघड झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३ लाख ५९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सखाराम झाबू पवार (३३, रा. बाजीउम्रद तांडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख ५९ हजार ५५० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. दीड वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की, बाजीउम्रद येथून गांजाची विक्री होत आहे. या माहितीवरून गौर यांनी पथकाला आदेशित करून कारवाई करण्यासाठी संबंधित ठिकाणी गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास धाड टाकली. त्या ठिकाणी छापा मारून झाबू पवार याला ताब्यात घेतले.शेतातील झोपडीची पाहणी केली असता गोणीमध्ये गांजा, रोख रक्कम, मोबाइल, एक दुचाकी व दुचाकीला असलेल्या पिशवीत तराजूकाटा, वजनमाप आदी साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, नायब तहसीलदार गणेश पोलास, कर्मचारी विश्वनाथ भिसे, कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, तुकाराम राठोड, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, फुलचंद हजारे, परमेश्वर धुमाळ, सदाशिव राठोड, वैभव खोकले, सोमनाथ उबाळे, लखन पचलोरे, किशोर जाधव, रवी जाधव, ज्योती खरात, राऊत, हिवाळे आदींनी केली.याप्रकरणी मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रात्री २ वाजेपर्यंत कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी काही अंतरावर पायी जाऊन ही कारवाई केली. वाहन नेले असते तर तो आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला असता.६.५०० ग्रॅम गांजा जप्त
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेत त्याच्या ताब्यातून ६ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा, इतर साहित्य असा एकूण ३ लाख ५९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ३५२ क्विंटल गांजा जप्त
पोलिस प्रशासनाने केलेल्या कारवायांमध्ये आतापर्यंत ३५२ क्विंटल गांजा जप्त केला आहे. हा गांजा न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे काही दिवसांतच नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Post a Comment