0
आकांक्षाच्या मैत्रिणीकडून तिचा स्वभाव व दैनंदिन क्रम जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

औरंगाबाद- माझी मुलगी लढवय्यी होती. माझ्यापासून काहीच लपवत नव्हती. ती कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या करू शकत नाही, अशा भावना आकांक्षा देशमुख हिचे वडील अनिल देशमुख यांनी व्यक्त केल्या. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचा संभ्रम अजूनही संपलेला नसल्याचे दिसून आले. घटनेच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्वत: अर्धा तास घटनास्थळाची पाहणी व चौकशी करत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

माजलगावातील माध्यमांच्या प्रतिनिधींनी आकांक्षाच्या वडिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझी बोलण्याची मन:स्थिती नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही, या मतावर ते ठाम आहेत. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना ही हत्या आहे की आत्महत्या असे विचारले असता, मी यावर सध्या काहीही बोलणार नाही. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून विशेष पथक तपास करत आहे. तपासानंतरच खरा काय तो प्रकार समोर येईल, असे प्रसाद यांनी सांगितले. दरम्यान, सिडको पोलिसांनी जवाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आकांक्षाच्या मैत्रिणीकडून तिचा स्वभाव व दैनंदिन क्रम जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. दोन दिवसांत पोलिसांनी या प्रकरणात २० पेक्षा अधिक लोकांचे जवाब नोंदवले आहेत. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सिडको पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचारी दिवस-रात्र या प्रकरणाचा तपास करत आहेत. उपनिरीक्षक सी.व्ही. ठुबे यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गळफासमध्ये गळ्यावर असा दाब येत नाही : 
गळफास आणि गळा दाबणे यातील नेमका फरक हा शवविच्छेदनात कळतो का ? असे तज्ज्ञांना विचारले असता त्यांनी हे दोन्ही प्रकार वेगळे असल्याचे सांगितले. दोन्ही प्रकरणातील खुणा वेगळ्या असतात. ज्या अर्थी पोस्टमॉर्टेमच्या प्राथमिक अहवालात कंप्रेशन ऑफ नेक असे नमूद केले आहे त्याअर्थी तिच्या गळ्यावर दाब आल्याचे स्पष्ट आहे. मात्र, हा दाब कशाचा आहे हे शोधणे पोलिसांचे काम आहे. मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली, मुंग्या लागल्या होत्या त्या अर्थी मृतदेह एकाच अवस्थेत पडून होता. साधारण सहा तासांनंतर मृतदेहात मोठ्या प्रमाणात बदल सुरू होतात आणि २४ तासांत कुजण्यास सुरुवात होते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

आत्महत्या दाखवण्याची चर्चा का ? :
एकीकडे शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल येताच सिडको पोलिसांनी पाच तास घटनास्थळाची पाहणी करत या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवला. उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनीदेखील घटनास्थळाची पाहणी केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी खात्यातीलच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही आत्महत्या की हत्या याबाबत प्रश्नचिन्ह उभे केले. ते का? हे मात्र समजू शकले नाही. खुनाचा गुन्हा नोंदवून आत्महत्येची चर्चा का? याबाबत पोलिस आयुक्तांकडेही उत्तर नाही. आमचा एकही अधिकारी ही आत्महत्या असल्याचे बोलला नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पोलिस आयुक्तांना संघटनांचे निवेदन : 
या प्रकरणात नि:पक्ष तपास व्हावा, असे निवेदन पोलिस आयुक्तांना शिवसेनेच्या महिला आघाडीने शुक्रवारी दिले. रंजना कुलकर्णी, सुनीता देव, प्रतिभा जगताप, प्राजक्ता राजपूत, आशा दातार, देवयानी सीमंत आदी पदाधिकाऱ्यांची या वेळी उपस्थिती होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अधीक्षकांना भेटून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची मागणी केली.

आकांक्षाचा खून की आत्महत्या : हे प्रश्न अनुत्तरितच 
- बारा तासांपेक्षा अधिक वेळ आकांक्षा कोणाच्याही संपर्कात नव्हती तरीही कोणालाही काहीच संशय का आला नाही? 
- किरकोळ कारणावरूनही पोलिसांना फोन करणाऱ्या महाविद्यालय प्रशासनाने घटना

- उघडकीस आल्यानंतर पोलिसांना माहिती का दिली नाही? परस्पर मृतदेह का हलवला? 
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फॅनवरील धूळही निघालेली नाही. छताला अँगल नाही, टेबल अाडवा पडलेला, त्याच्या पायांना काही बांधल्याचे दिसले नाही. 
- आकांक्षाच्या खोलीसमोरून बाथरूमला जाण्याचा रस्ता आहे. तरीही १२ तास लोटलेला दरवाजादेखील कोणी उघडून का पाहिला नाही?
Akansha's Father says, She is very strong, she can't sucide

Post a comment

 
Top