0
  • The Prime Minister's intervention of farmer's mani orderनाशिक लासलगाव - निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी गेल्या आठवड्यात लासलगाव बाजार समितीत विकलेल्या कांद्याला किलोला अवघा १ रुपया ४० पैसे दर मिळाला होता. ७५० किलो कांद्याचे त्यांना अवघे १०६४ रुपये मिळाले होते. त्यामुळे उद्विग्न झालेल्या साठे यांनी स्वत:च्या खिशातून ५४ रुपये टाकत १११८ रुपयांची मनिऑर्डर पंतप्रधान सहायता निधीसाठी पाठवून सरकारच्या धोरणांचा निषेध केला होता. या प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाने तातडीने दखल घेत जिल्हा प्रशासनाला याबाबत विचारणा केली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याचे क्षेत्र किती आहे, त्याने कांद्याची केलेली लागवड व त्यातून मिळालेले उत्पन्न किती याची माहिती घेऊन त्याला मिळालेला अल्प भाव सत्य असल्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला असून तो आता केंद्राकडे पाठवला जाणार अाहे. 
    जिल्हाधिकारी कार्यालयातून पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सोमवारी दूरध्वनीवरून साठे यांची विचारपूस करत त्यांच्याकडून माहिती घेतली. नोव्हेंबर २५ ते ३० या पाच दिवसांच्या कालावधीत लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी आणलेल्या कांद्याला या स्वरूपात दर मिळाले असल्याचे जिल्हा प्रशासनाने अहवालात म्हटले आहे. दर घसरल्यामुळे शेतकरी वर्गात किती संतप्त भावना आहेत हे साठे यांच्या रूपाने समोर आले. आता थेट पंतप्रधानांपर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहोचल्यामुळे आता तरी कांद्याला 'अच्छे दिन'येतील का, साठे यांना नेमका काय दिलासा मिळतो, बाजारभावात वाढ होऊन त्यांच्यासारख्याच हजारो शेतकऱ्यांनाही काही दिलासा मिळेल का याकडे आता लक्ष लागले आहे.

    हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आता अनोख्या पद्धतीने शासनाच्या निषेधाचा मार्ग अवलंबिला आहे. साठे यांनी कांदा विक्रीतून मिळालेल्या १०६४ रुपयांऐवजी वर्षातील अकरावा महिना आणि २०१८ साल सुरू असल्याने १११८ रुपयांची रक्कम पंतप्रधान सहायता निधीसाठी पाठवली. त्यावर केंद्राने तातडीने राज्य शासनाला सत्य परिस्थितीची विचारणा केली. त्यानुसार शासनाने जिल्हा प्रशासनाकडे त्याची विचारणा करत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

    पिढ्यान पिढ्यांपासून कांद्याच्या भावाचा प्रश्न तसाच 
    कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट. कांद्याच्या बाबतीत हे नित्याचेच झाले आहे. आमच्या पिढ्यानपिढ्यांपासून कांद्याच्या भावाचा प्रश्न तसाच आहे. त्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळून शेतकरी वर्ग समाधानी कधी होणार हा खरा प्रश्न आहे. आजची अवस्था पाहता कांद्याला हमीभावाची गरज असून सरकारने निर्यातीचे चांगले व शेतकरी हित जोपासणारे धोरण अवलंबण्याची गरज आहे. कांद्याला चांगला भाव न मिळाल्यास आत्महत्यांचे प्रमाण वाढू शकेल. संजय साठे, तक्रारदार कांदा उत्पादक शेतकरी

Post a Comment

 
Top