0
 • पुणे- “खासगी-सहकारी दूध संघ आणि सरकार यांच्या वादात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सव्वादोनशे कोटी रुपयांचे देणे थकले आहे. सरकारने हा प्रश्न लवकर मिटवावा. दूध अनुदानासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणू नका,” असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केले.
  “अनुदानाची रक्कम पडून आहे. परंतु, दूध संघांकडूनच व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याने अनुदान देण्यात अडचणी येत असल्याचे सरकारमधील मंत्री सांगतात. गेल्या दोन-अडीच महिन्यांचे अनुदान सरकारने दिले नसल्याचे सांगत दूध संघांनी गाव पातळीवर शेतकऱ्यांचे पैसे रोखले आहेत. आधीच चारा टंचाई आणि दुष्काळात सापडलेला शेतकरी या वादात भरडला जात आहे,’ अशी चिंता शेट्टी यांनी व्यक्त केली.
  शेट्टी म्हणाले, १ ऑगस्टला दूध दरासाठीचे आंदोलन केल्यानंतर सरकारने दुधावर प्रक्रिया करणाऱ्या दूध संघांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. त्यामुळे दूध उत्पादकांना लिटरला २५ रुपये दराची खात्री झाली. प्रत्यक्षात शासनाकडून अनुदानाची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने दूध संघांनी शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांमधील काही संघांनी वीस रुपये प्रति लिटर दराने दुधाचे पेमेंट चालू केले आहे. शासनाने पैसे दिल्यावर उर्वरित पाच रुपये मिळतील, असे दूध संघ शेतकऱ्यांना सांगत आहेत.
  यंदाच्या दुष्काळी स्थितीत दुधाळ जनावरे पोसण्याचा भार आधीच शेतकऱ्यांवर आहे. त्याच दुधाचे पैसे थकू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. पुष्ट काळामुळे दुधाचे उत्पादन वाढले आहे. शेजारच्या राज्यांमधील दूध आपल्या राज्यात येत आहे. दुधाला दरही नाही आणि दूध घरीही ठेवता येत नाही, ही अवस्था आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याचे शेट्टी म्हणाले. येत्या आठवड्यात दूध संघ आणि सरकारची बैठक होणार आहे. यात तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांना दूध दरासाठी पुन्हा आंदोलन हाती घ्यावे लागेल. सरकारकडून अनुदान वेळेत मिळत नसल्याने अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशाराही काही दूध संघांनी दिल्याचे शेट्टी म्हणाले.
  दुधातील राजकारण 
  पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील बहुतेक खासगी आणि सहकारी दूध संघांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. अनुदानासाठी संघांना त्यांच्याकडे येणारे दूध, शेतकरी याची अचूक माहिती द्यावी लागते. यामुळे गैरप्रकार कमी होत आहेत. त्यामुळे बिथरलेल्या चालकांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवून शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
  सामान्यांना बाटलीबंद दूध परवडणारे नाही 
  पॉलिथिन पिशवीतल्या दूध विक्रीवर निर्बंध आल्यामुळे दूध महागण्याची भीती खासदार शेट्टी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सरकारने याबाबत दंडेलशाही न करता पॉलिथिन पिशवीतून दूध विक्री पूर्ववत चालू ठेवावी. वाटल्यास पॉलिथिन पिशवीची जाडी वाढवण्यासंदर्भात विचार करावा. मात्र, बाटलीतून दूध देणे अव्यवहार्य आणि अधिक खर्चिक आहे. यामुळे दुधाच्या दरात १२ ते १५ रुपयांची भाववाढ होऊ शकते
  .

  सामान्यांना बाटलीबंद दूध परवडणारे नाही: शेट्टी

  • Shetty says, politics in Milk production

Post a comment

 
Top