0
नांदेड - माळाकोळी भुजंग गोरखनाथ मस्के या ब्रेन डेड रुग्णाचे अवयवदान करण्यासाठी बुधवारी येथे ग्रीन काॅरिडाॅर करण्यात आला. शहरात ग्रीन काॅरिडाॅर करण्याची ही चौथी वेळ होती. मंदिर उभारणीच्या कामावर मजूर असलेल्या भुजंगचे  हृदय घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळ हे जवळपास ५ किलोमीटरचे अंतर अवघ्या ४ मिनिटे १२ सेकंदात पार केले. भुजंगच्या अवयवदानामुळे ४ जणांना जीवदान मिळाले तर दोघांचे अंधत्व निवारण झाले.

माळाकोळी हे गाव जिल्ह्यात मंदिर बांधकाम करणाऱ्या शिल्पकारांसाठी प्रसिद्ध आहे. राज्याच्या विविध भागांत या गावातील शिल्पकारांनी बांधलेली मंदिरे हजारोंच्या संख्येेने आहेत. माळाकोळी येथील गोरखनाथ मस्के यांचाही हाच व्यवसाय आहे. त्यांना भुजंग व संतोष अशी दोन मुले असून तेही याच व्यवसायात आहेत. भुुजंग हा सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील मासलेगाव येथे मंदिर बांधकामासाठी गेला होता. मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन शेवटची रंगरंगोटी सुरू होती. रंगरंगोटी करीत असतानाच २६ नोव्हेंबर रोजी तो मंदिराच्या कळसावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने प्रथम त्याच्यावर सोलापूर येथे उपचार करण्यात आले. नंतर त्याला डाॅ. ऋतुराज जाधव यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचे ब्रेन डेड झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर डाॅ. ऋतुराज जाधव यांनी त्याच्या आप्तेष्टांना ही माहिती दिली. तेव्हा त्याचे आई, वडील, पत्नी यांनी काळजावर दगड ठेवून त्याच्या अवयवदानाला परवानगी दिली. डाॅ. जाधव यांनी भुजंगचे आप्तेष्ट अवयवदानाला तयार झाल्यानंतर ही माहिती ग्लोबल हाॅस्पिटलचे डाॅ. त्र्यंबक दापकेकर यांना दिली. त्यानंतर प्रशासनाला रीतसर कळवल्यानंतर अवयवदानासाठी ग्रीन काॅरिडाॅर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हृदय मुंबईला तर किडनी औरंगाबाद, नांदेडला : ग्लोबल हाॅस्पिटलचे डाॅ. त्र्यंबक दापकेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजंगचे हृदय मुंबईला पाठवण्यात आले. एक किडनी आणि लिव्हर औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आले, तर एका किडनीचे ग्लोबलमध्येच दुसऱ्या रुग्णाला प्रत्यारोपण करण्यात आले. दोन डोळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्रपेढीला देण्यात आले. भुजंग हा मंदिर बांधकामावर मजुरीचे काम करीत होता. एका मजुराच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान मिळाले तर दोन जणांना नवी दृष्टी मिळाली. हृदयही मुंबईत पोहोचले असून तिथे त्याचे प्रत्यारोपणही सुरू झाले. मुंबईत अवघ्या २५ मिनिटांत विमानतळावरून रुग्णालयात हृदय पोहोचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 
ग्लोबल हाॅस्पिटलमधून हृदय घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सचा चालक ज्ञानेश्वर गवते पाटील याने दिलेल्या माहितीनुसार, हृदय घेऊन ग्लोबलमधून आम्ही १२ वाजून ३१ मिनिटांनी निघालो. जवळपास पाच किलोमीटरचे अंतर अवघ्या ४ सेकंद १२ मिनिटांत पार केले.

औरंगाबादला रस्तेमार्गे रवाना : भुजंगची एक किडनी आणि लिव्हर रस्तेमार्गे अॅम्ब्युलन्सने औरंगाबादला रवाना करण्यात आले. दुपारी १ वाजून ७ मिनिटांनी हे अवयव घेऊन अॅम्ब्युलन्स रवाना झाली.

भुजंग कुटुंबीयांच्या औदार्याची शासनाने दखल घ्यावी 
भुजंग हा कामगार होता. परंतु त्याच्या कुटुंबात माणुसकी आणि संवेदनशीलता दिसून आली. अवयवदानाचा विषय काढताच त्याचे कुटुंबीय तयार झाले. अत्यंत कठीण परिस्थिती आणि मन:स्थिती असतानाही त्यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवले. भुजंगच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान मिळाले. दोन जणांचे अंंधत्व निवारण झाले. यापासून समाजाने बोध घेणे गरजेचे आहे. भुजंगच्या कुटुंबीयांनी दाखविलेल्या या औदार्याची शासनानेही दखल घेतली पाहिजे, असे डाॅ. त्र्यंबक दापकेकर म्हणाले.Organ donation in nanded

Post a Comment

 
Top