0
 • परभणी - दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने पेडगावमध्ये (ता. परभणी) पाहणी करण्याचे नियोजन केले. मात्र, ऐनवेळी पाहणी होऊ शकली नाही. त्यामुळे केंद्राच्या या पथकास शेतकऱ्यांच्या तीव्र रोषास सामोरे जावे लागले. पेडगाव सोडून पुढे निघालेल्या पथकास गावातील शेतकऱ्यांनी १५० मोटारसायकलींद्वारे मानवत रोड येथील रेल्वे गेटवर गाठले. शेतकऱ्यांच्या संतप्त भावना पाहून अखेर या परत निघालेल्या पथकाला पेडगावात पाहणीसाठी यावे लागले.
  जिल्ह्यातील परभणी, सेलू व मानवत या तीन तालुक्यांतील अनुक्रमे पेडगाव, गणेशपूर व रूढी या एका रस्त्यावरील तीन गावांत पाहणी करण्याच्या दृष्टीने भेटी देण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवारी बुलडाणाहून गणेशपूर येथे दाखल झाले. १० मिनिटांच्या पाहणीचे सोपस्कार आटोपून हे पथक रूढीकडे जाण्यास निघाले. त्यामुळे पेडगावच्या ग्रामस्थांना आपले गाव पाहणीतून वगळले जात आहे, हे समजताच ते संतप्त झाले. १०० ते १५० मोटारसायकलींद्वारे पेडगावमधील शेतकरी रूढी या गावाकडे निघाले. हे शेतकरी मानवत रोड येथे आले असता सचखंड एक्स्प्रेस औरंगाबादकडे रवाना होत असल्यामुळे रेल्वे गेट बंद होते. सेलू मार्गे रूढीकडे निघालेला केंद्रीय अधिकाऱ्यांचा ताफायाच गेटवर दाखल झाला. ही संधी साधून संतप्त शेतकऱ्यांनी केंद्राचे नीती आयोगाचे सल्लागार मानस चौधरी, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर व जिल्हाधिकारी पी.शिवशंकर असलेल्या गाडीला घेराव घातला. शेतकऱ्यांनी ताफ्यातील वाहनांसमोरच झोपण्याचा इशारा देत संतप्त भावना व्यक्त करीत पथकाला पेडगावला येण्यास भाग पाडले आणि गाड्या रेल्वे गेटहून माघारी पेडगावकडे रवाना झाल्या. पेडगावमध्ये गणेश हरकळ व उत्तमराव वरकड यांच्या शेतातील पिकांची पाहणी या पथकाने केली.
  पथकातील अधिकारी 
  आयएमसीटी अंतर्गत दाखल झालेल्या या पथकाचे प्रमुख केंद्रीय नीती आयोगाचे सहसल्लागार मानस चौधरी हे होते. त्यांच्यासह या पथकात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे एस.सी.शर्मा, ग्रामीण विकास मंत्रालयाचे अव्वर सचिव एस.एन.मेहरा यांचा समावेश होता. पथकासमवेेत विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, अप्पर आयुक्त विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, कृषी विभागाचे सहसंचालक श्री.जगताप हे होते.
  अपमान करू नका, भावना लक्षात घ्या.. 
  मानवत रोड येथील रेल्वे गेटवर ताफा अडवल्यानंतर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, गजानन देशमुख, गोपाळ देशमुख, अब्दुल हाफीज, मोबीन कुरेशी, प्रमोद देशमुख, नाना पारधे या शेतकऱ्यांनी पथकाचे प्रमुख चौधरी यांच्यासह जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्यासमोर संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यांनी पेडगावला वगळल्याचे कारण विचारले. शेतकऱ्यांचा अपमान करू नका, त्यांच्या भावना लक्षात घ्या. पेडगावला न आल्यास गाडीसमोर झोपू असा इशारा या शेतकऱ्यांनी दिल्यानंतर पथकातील अधिकारी भांबावून गेले.
  स्थानिक अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ 
  पेडगावची रद्द झालेली पाहणी करण्यासाठी पथक येत असल्याचे कळताच स्थानिक अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. कसेबसे धावत पळत पेडगाव गाठण्याची वेळ या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आली. परंतु तोवर या पथकाने पाहणी आटोपली होती.
  दुचाकीला धडक : परळी तालुक्यातील रेवली येथील दुष्काळी दौरा आटोपून बीडकडे निघालेल्या केंद्रीय पथकातील विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या वाहनाने परळी तालुक्यातील पांगरी गावाजवळ एका दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील तिघे जखमी झाले.
  ... अन् पथक माघारी फिरले 
  पेडगावला का वगळले, असे विचारल्यावर तालुक्याचा रिपोर्ट आधीच पाठवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगताच शेतकरी अधिकच भडकले. अखेर पथक माघारी फिरत पेडगावकडे वळले.
  अडवली वाट : संतप्त शेतकऱ्यांनी रेल्वे गेटवर पथकाला अडवल्यावर तेथे उभ्या इतर वाहनधारकांनीही गाड्या बाजूला घ्यायच्या नाहीत, असा निर्धार केला. पुढेे जाण्याचा मार्गच अडल्यामुळे पथकाला नमते घ्यावे लागले.
  गणेशपूरमध्येही अधिकाऱ्यांची दमछाक 
  गणेशपूर(ता. सेलू) येथे पथकातील अधिकाऱ्यांनी जमिनीचे हेल्थ कार्ड, जॉब कार्ड, माती परीक्षणातील अनियमिततेबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांची चांगलीच दमछाक झाली. यावर केंद्रीय अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
  Drought survey squad issue in parbhani

Post a Comment

 
Top