0
उंब्रज : नवीन कवठे, ता. कऱ्हाड येथून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या युवकाचा खून झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी एका संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संशयिताने बंधाऱ्याच्या डोहात मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बंधाऱ्यातील डोहातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

वैभव आनंदराव घाडगे (वय २८) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कवठे येथील वैभव घाडगे हा युवक रविवार, दि. २५ रोजी रात्री जेवण करण्यास परत येतो, असे सांगून घरातून निघून गेला. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत परत आला नाही.
वैभव त्याच्या मित्रांकडे गेला असावा, असे समजून कुटुंबीयांनी उशिरापर्यंत त्याची वाट पाहिली. तसेच त्याच्या मित्रांशीही संपर्क करण्यात आला. गावाच्या परिसरातही त्याला शोधण्यात आले. नातेवाइकांनी शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा न लागल्यामुळे याबाबतची फिर्याद शुक्रवारी उंब्रज पोलीस ठाण्यात देण्यात आली.

हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे उंब्रज पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. रात्री उशिरापर्यंत पोलीस याप्रकरणी अनेकांकडे चौकशी करीत होते. त्यातून एका संशयिताचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली देत वैभवचा खून केल्याचे सांगितले.
तसेच भुयाचीवाडी येथील डोहात मृतदेह टाकल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस पथक शनिवारी सकाळीच भुयाचीवाडी बंधाऱ्याजवळ पोहोचले. त्याठिकाणी स्थानिक पाणबुड्यांच्या साह्याने शोध घेण्यात आला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात यश आले. वैभवच्या खुनाच्या कारणाचा पोलीस तपास करीत आहेत.Satara: The murder of a youth who was missing from the house, suspected by the police | सातारा : घरातून बेपत्ता झालेल्या युवकाचा खून,  संशयित पोलिसांच्या ताब्यात

Post a Comment

 
Top