0
औरंगाबाद- यंदा महाराष्ट्रात अपुरा पाऊस झाल्याने दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात ज्वारी आणि गहू या प्रमुख अन्नधान्याचे भाव कमालीचे वाढले आहेत. मालदांडी ज्वारीला केज कृषी उत्पन्न बाजार समितीत क्विंटलमागे ४७०० रुपये तर पुण्यात गव्हाला ४५०० रुपये भाव मिळाला आहे. गतवर्षीच्या नोव्हेंबरमधील किमतीच्या तुलनेत यंदा ज्वारी ५४.९४% तर गहू २०.३२ टक्क्यांनी महागला आहे.

अॅगमार्कनेट या देशातील जवळपास २७०० हून अधिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील व्यवहाराची नोंद ठेवणाऱ्या यंत्रणेच्या अहवालानुसार, यंदा गहू, ज्वारीसह सर्वच अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेत. ज्वारीला सर्वत्र चांगली मागणी असून पुरवठा कमी पडत असल्याने किमतीत वाढ होत असल्याचे चित्र आहे. देशात महाराष्ट्रात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते. महाराष्ट्रातील शाळू, मालदांडी ज्वारीला मागणी असते. मात्र पाऊसमान कमी झाल्याने ज्वारी, गव्हाच्या किमती वाढत असल्याचे आडत व्यापाऱ्यांनी सांगितले.

नोव्हेंबरमध्ये ज्वारीला ३००० ते ४५०० पर्यंत भाव
नोव्हेंबरमध्ये राज्यातील बाजार समित्यांत ज्वारीला क्विंटलमागे २९५० ते ४४०० रुपये भाव मिळाला. केज (जि. बीड) बाजार समितीत ज्वारीला १२ नोव्हेंबर रोजी ४७०० रुपये भाव मिळाल्याची नोंद अॅगमार्कनेटने केली आहे. तर पुण्यात गव्हाला क्विंटलमागे ४५०० रुपये भाव मिळतो आहे.

प्रमुख बाजार समित्यांतील १ ते ३० नोव्हेंबर या काळात मिळालेले सर्वाधिक भाव असे

समिती- ज्वारी गहू
> नगर- ४००० २६००
> सोलापूर- ३१०० २९१०
> जालना- ३६२५ २५२०
> औरंगाबाद- २९५० २५००
> कळंब- ४४०१ ३२८०
> पुणे- ४५०० ४५००
> अमरावती- १९०० २२५०
> केज- ४७०० ३०००

महिनाभरात ज्वारी १३%, तर गहू ५ टक्क्यांनी महागला
अॅगमार्कनेटच्या नोंदीनुसार, राज्यात ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये गहू आणि ज्वारी महागले आहेत. या महिनाभरात ज्वारीच्या किमतीत १३.२ टक्के तर गव्हाच्या किमतीत ५.१७ टक्के वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही धान्यांच्या किमती वाढल्या आहेत.Jowar prices increase by 55% and wheat by 20%in a year

Post a Comment

 
Top