0
राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्‍ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांचे पुत्र कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने यांनी यापूर्वीच मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून घेतले आहे. निवेदिता माने यांनी हातकणंगले मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्‍व केले आहे.

 स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे या मतदार संघातून विद्यमान खासदार आहेत. हा मतदारसंघ आगामी लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींना सोडण्याच्या निर्णयामुळे माने गट नाराज होता. त्यामुळे यापूर्वीच माने गटाचे नेत धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शेट्टी-माने अशीच हातकणंगलेतून लढत

मतदार संघातील माने गटाचे वर्चस्‍व पाहता शिवसेनेने धैर्यशील माने हेच लोकसभेसाठी उमेदवार असणार असल्याचे पूर्वीच स्‍पष्‍ट केले आहे. त्यामुळे राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने अशीच लढत आगामी लोकसभेत हातकणंगले मतदार संघातून असल्याचे निश्चित मानले जात आहे.

शेट्टी-पवार भेटीने बदलली समिकरणे

विद्यमान खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची काही दिवसांपूर्वीच भेट झाल्यानंतर या मतदारसंघातील समीकरणे बदलणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार तसेच घडले. पवार यांच्या भेटीला माने कुटुंबीय गेले नव्हते. तसेच पवार यांनी देखील शेट्टी यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला होता.

Post a comment

 
Top