0
पोलिसांसमोर आव्हान चोरट्यांनी साड्यांसह जुने ड्रेसही नेले सोबत

धुळे- शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरू असून, चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे शहरातील कुमारनगर परिसरातील सेवानिवृत्त शिक्षक रमेश पाटील यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. चाेरट्यांनी तेरा तोळे सोन्यासह एक लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कुमारनगर परिसरात असलेल्या सेंट्रल बँकेच्या शाखेजवळ रमेश विनायक पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक राहतात. त्यांची मुले अमित व नितीन वर्धा व नवापूर येथे नोकरीला आहेत. त्यामुळे रमेश पाटील व त्यांच्या पत्नी हिराबाई कुमार नगरात राहतात. ते काल शनिवारी रात्री घराच्या पहिल्या मजल्यावर झोपले होते. रविवारी सकाळी श्रीमती पाटील नेहमीप्रमाणे उठून तळमजल्यावर आल्या. त्या वेळी घरातील दिवे सुरू असल्याचे त्यांना दिले. शिवाय कुलूपही तोडलेले आढळून आले. त्याचबराेबर कपाटातील साहित्यही अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. शिवाय रोख रक्कम व दागिनेही कपाटात नव्हते. त्यामुळे पाटील कुटुंबीयांनी लागलीच शहर पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिस पथक दाखल झाले. शिवाय ठसेतज्ज्ञ व श्वान पथक आले. घटनास्थळावरून पाेलिसांनी चोरट्यांच्या हातांचे ठसे घेतले. ताेपर्यंत पाटील यांच्या घराजवळ गर्दी झाली हाेती.


या घटनेत चोरट्यांनी सुमारे ४० हजार रुपये रोख आणि सुमारे तेरा तोळ्यांचे दागिने लांबवले. चोरट्यांनी जुन्या साड्या व ड्रेसही नेले. या प्रकरणी रमेश पाटील (वय ६९) यांच्या तक्रारीवरून शहर पेालिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

पोलिस म्हणतात अशी झाली चोरी...
पोलिसांच्या माहितीनुसार चोरटा पाटील यांच्या घराच्या दरवाजाजवळ असलेली लोखंडी जाळीला धरून वरच्या मजल्यावर आला. त्यानंतर जिन्यावाटे तो खाली उतरला. दरवाजाचे कुलूप तोडून त्याने आत प्रवेश केला. त्यानंतर तो त्याच मार्गाने पसार झाला. तसेच मध्यरात्री एक वाजेपर्यंत रमेश पाटील जागे होते. त्यामुळे मध्यरात्री दोननंतर ही चोरी झाली असावी, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

वीरूने दाखवला बुटांचा ठसा
घटनेनंतर पोलिस मुख्यालयातून श्वान पथक बोलावण्यात आले. त्यानंतर वीरू या श्वानाला कपाटातील वस्तूंचा गंध देण्यात आला. त्यानंतर कपाट, जिना व लोखंडी जाळीपर्यंतचा माग वीरूने दाखवला. शिवाय जाळीवरून उडी घेणाऱ्या चोरट्याचा पायांच्या ठशांपर्यंत श्वानाने पोलिसांना नेले.

पोलिसांविषयी वाढतोय असंतोष...
गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीची शृंखला सुरू आहे. बोरसे ब्रदर्सच्या कार्यालयातील चोरी, साक्री रोडवर वॉचमनला मारहाण करून केलेली लूट ते बस स्थानकातील प्रवाशांचे साहित्य लांबवण्याच्या प्रकार सातत्याने सुरू आहे. या घटनांचा तपास होण्यापूर्वीच पुन्हा पाटील यांच्या घरी चोरी झाली. सतत चोरीच्या घटनांमुळे पोलिसांविषयी नाराजीचे वातावरण आहे. पोलिसांच्या गस्तीपथकाविषयी तक्रारी वाढल्या आहेत.
Theft session continued in Dhule

Post a comment

 
Top