0
मोबाइलवर बोलत असताना त्यांच्या मागून दुचाकीने येऊन भामट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा केला होता प्रयत्न

जळगाव- धावत्या दुचाकीवरून नागरिकांच्या हातातून मोबाइल हिसकावल्याच्या चार घटना १० डिसेंबर रोजी घडल्या होत्या. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी मायादेवी मंदिरासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथून एका महिलेच्या हातातील मोबाइल भामट्यांनी लांबवला होता. या प्रकरणात रामानंदनगर पोलिसांनी रविवारी दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दुचाकी व मोबाइल हस्तगत करण्यात आला.

शुभम राजेंद्र चव्हाण उर्फ विक्की (वय २१, रा. साईछत्र चौक, वाघनगर) व शुभम विजय दाभाडे उर्फ गणेश (वय २५, रा. मगर पार्क, वाघनगर) अशी चोरट्यांची नावे आहेत. यातील विक्कीला यापूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनी ११ डिसेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजता सपना कुणाल पांडे (रा. मायादेवीनगर) यांच्या हातातून मोबाइल हिसकावून पळ काढला होता. पांडे या डॉ. आंबेडकर न्याय भवनजवळ मोबाइलवर बोलत असताना त्यांच्या मागून दुचाकीने येऊन भामट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळलेला असल्यामुळे सोनसाखळी ओढता आली नाही. त्याने मोबाइल ओढून पळ काढला होता. या वेळी रस्त्यावरील सात-आठ लोकांनी भामट्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केले होते; परंतु दुचाकीचालकाने अॅक्सिलेटर वाढवून जोरात आवाज काढला व अंगावर दुचाकी घातली. यामुळे समोर आलेले लोक घाबरून बाजूला सरकले. सेकंदातच भामट्यांनी मार्ग काढून काव्यरत्नावली चौकाच्या दिशेने पळ काढला होता. पळून जात असताना भामट्यांनी नागरिकांकडे पाहून छद्मी हास्य केले होते. गणेश व विक्की यांनीच हा मोबाइल ओढल्याची माहिती विशेष नवचैतन्य कोर्समधील कर्मचारी प्रदीप चौधरी यांना रविवारी मिळाली. यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे, गोपाळ चौधरी, विजय खैरे, विलास शिंदे, ज्ञानेश्वर कोळी, रूपेश ठाकरे, किरण धनगर यांच्या पथकाने वाघनगर, कोल्हे हिल्स परिसरात सापळा रचला. सुरुवातीस गणेशला ताब्यात घेतले. तर विक्की हा कोल्हे हिल्स परिसरात गांजा ओढत होता. काही तासात त्याच्याही मुसक्या आवळल्या. दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पांडे यांचा मोबाइल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

चार मोबाइल, एक सोनसाखळीचा संशय
गणेश आणि विक्की यांनी आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे. १० डिसेंबर रोजी जिल्हापेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून डॉ. शांताराम बडगुजर, प्रणव जोगी, वंदना पाटील व योगेश चौधरी या चार जणांच्या हातातून मोबाइल हिसकावल्याची घटना घडली होती. तसेच १५ दिवसांपूर्वी जाकीर हुसेन कॉलनीतून एका महिलेची सोनसाखळी लांबवली आहे. सोनसाखळी लांबवल्यानंतर चोरटे कोल्हे हिल्सच्या दिशेनेच पळून गेले होते. या सर्व गुन्ह्यांमध्ये गणेश व विक्की यांचाच सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शुभम चव्हाण उर्फ विक्की
गुन्हे करण्याच्या वेळी विक्की दुचाकी चालवत असे. गर्दीतून, खराब रस्त्यावरून वेगाने दुचाकी चालवण्यात तो तरबेज आहे. तर मागच्या सीटवर बसलेला गणेश हा नागरिकांच्या हातातील मोबाइल, महिलांच्या सोनसाखळ्या तोडत होता. गणेशच्या भावाच्या नावावर असलेल्या दुचाकीचा वापर गुन्ह्यात केला गेला आहे. चोऱ्या केल्यानंतर पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी दुचाकीची नंबरप्लेट काढून ठेवली होती. पोलिसांच्या पथकाने ही दुचाकी जप्त केली आहे.Crime news in Jalgoan

Post a comment

 
Top