0
विदर्भातील कुस्तीचा गढ अशी ख्याती असलेल्या अंबानगरीतील कुस्ती वर्तुळात आनंद साजरा होत आहे.

अमरावती- राज्यातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात सराव करणारा तसेच पाच वेळा विदर्भ केसरी राहिलेले संजय तीरथकर यांचा पठ्ठा शोएब खानने विदर्भाला पहिले पदक दिले आहे. त्याने गादी गटात ७९ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले, त्यामुळे विदर्भातील कुस्तीचा गढ अशी ख्याती असलेल्या अंबानगरीतील कुस्ती वर्तुळात आनंद साजरा होत आहे.

जालना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शोएबने पहिल्या फेरीत नाशिक शहराच्या कुमार बाभरेचा पराभव केल्यानंतर अमरावतीच्याच अब्दुल शोएबला नमवले. दुसऱ्या फेरीत शोएब खानने बुलडाण्याच्या चेतन बोडखेला चीत करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यानंतर तिसऱ्या फेरीत औरंगाबाद जिल्ह्याच्या मोईन शेखला आकाश दाखवून कांस्य पदकाच्या लढतीत धडक दिली. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात शोएबने हिंगोलीच्या रामदास जाधवला नमवून बाजी मारली.


दोन वर्षांआधी नागपुरात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शोएबने पदक जिंकले होते. तो दोनदा विदर्भ केसरीही राहिला आहे. एचव्हीपीएम येथील कुस्ती विभागात शोएब प्रशिक्षक डाॅ. संजय तीरथकर, डाॅ. रणबीरसिंग राहल, मनोज तायडे यांच्या मार्गदर्शनात सातत्याने सराव करीत असतो.

येथेच त्याने सुरुवातीपासून कुस्तीचे डावपेच कसे टाकायचे याचे धडे घेतले. शोएबने मिळवलेल्या यशाबद्दल एचव्हीपीएम प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, मंडळाच्या सचिव डाॅ. माधुरी चेंडके, एचव्हीपीएम अभियांत्रिकीचे संचालक डाॅ. श्रीकांत चेंडके, डाॅ. सुरेश देशपांडे, डीसीपीईचे प्राचार्य डाॅ. के.के.देबनाथ, माजी प्राचार्य वसंत हरणे, डाॅ. दिनाननाथ नवाथे, डॉ. विजय पांडे, जितेंद्र भुयार, प्राध्यापक संजय हिरोडे, आशिष आटेकर आदींनी माजी कुस्तीपटू व खेळाडूंनीही त्याचे अभिनंदन केले आहे.
Shoaib's first medal in Maharashtra Kesari tournament

Post a Comment

 
Top