0
येथील डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहामधील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज व्यायामशाळा आणि लायब्ररी उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे मंगळवारी दिली.
डॉ. देशमुख वसतिगृहास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. वसतिसगृहाची पाहणी करून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विशेष कार्य अधिकारी, पणनचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष राहूल चिकोडे, वसतिगृहाचे अधिक्षक निवृत्त कॅप्टन महादेव यादव उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिह्यात डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह उभारण्याचा शासनाचा मानस आहे. आतापर्यंत 5 जिल्हय़ांमध्ये अशी वसतिगृहे विकसित केली आहेत. भविष्यात राज्यातील सर्व जिह्यात टप्प्या- टप्प्याने वसतिगृहे विकसित केली जातील. या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची दक्षता घेतली जाईल.
ते म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासून राज्य शासनाची वाटचाल सुरू आहे. जिह्यात शासनाने राज्यातील पहिले डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरु केले आहे. कोल्हापुरातील या  वसतिगृहाची 72 विद्यार्थी क्षमता आहे. सध्या वसतिगृहात 52 विद्यार्थी आहेत. या वसतिगृहात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिस्त आणि शांतता निश्चितच वाखाणण्यासारखी आहे. भविष्यातही वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी नवनव्या योजना राबवण्याचा मानस आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

Post a Comment

 
Top