0

भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना पर्यायच नाही, अशा चर्चेने वेग घेतला


  • नगर : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपतील इनकमिंग सध्या रोडावलं असलं तरीदेखील लोकसभा निवडणुकीला अद्याप चार- सहा महिन्यांचा कालावधी बाकी असल्यानं या काळात नेमकी कोणती राजकीय समीकरणं शिजतील, याचा अंदाज आत्ताच बांधणे काहीसं अवघड आहे. या निकालांचा कल काहीसा काँग्रेसच्या बाजूने झुकण्यापूर्वी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या नावाची चर्चा जोमाने सुरू झाली होती. परंतु जसं जसं वातावरण बदलत गेलं, तशी ही चर्चा थंडावली आणि भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना पर्यायच नाही, अशा चर्चेने वेग घेतला. तथापि महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर ही चर्चासुद्धा आता वेगळ्या दिशेला भटकताना पाहायला मिळते आहे. महानगरपालिकेची निवडणूक भाजपचे शहराध्यक्ष या नात्याने खासदार दिलीप गांधी यांनी एकहाती हाताळली. स्वबळावर सत्ता आणण्याचा संकल्प त्यांनी केला. परंतु शहरातील राजकीय तालमीत धुमसून तयार झालेल्या नगरी मतदारांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. त्यामुळे आता जसे विजयाचे शिल्पकार तेच ठरले असते, त्याच धर्तीवर अपयशाचं खापरही एकट्या दिलीप गांधी यांच्याच माथ्यावर फोडण्याचं काम भाजपच्या धुरिणांकडून सध्या चालू झालेलं आहे. त्यामुळेच भाजपची उमेदवारी पुन्हा दिलीप गांधी यांना मिळते की नाही? अशी चर्चा दक्षिणेच्या कानाकोपऱ्यात रंगलेली आहे. नगर जिल्ह्याचे राजकारण हे तसं कायम अनाकलनीयच ठरलेलं आहे. जे राजकीय पक्षांच्या मनात असतं, ते नेमकं मतदारांच्या मनात नसतं आणि जे मतदारांच्या मनात असतं, तसंच घडतं असंदेखील नाही. त्यामुळे सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीवर, 'पिक्चर अभी बाकी है.. मेरे दोस्त!' असं म्हणण्यावाचून गत्यंतर नाही.

    डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा तशी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. शिवाजी कर्डिले यांनी पक्षप्रवेशाचे जाहीर आवतानही डॉ. सुजय विखे यांना अनेक वेळा दिलेले आहे. वरिष्ठ पातळीवरदेखील तशा हालचाली सुरू असल्याचे संकेतही मिळत होते. परंतु त्याबाबतचा कोणताही निर्णय घेतला गेला नव्हता. मागील सहा महिन्यांपासून या चर्चेला एका अर्थानं तिलांजली मिळाली. कारण लोकसभा निवडणूक लढवायचीच यावर ठाम असणारे डॉ. सुजय विखे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमधून दक्षिणेचा मतदारसंघ काँग्रेसला मिळवण्याच्या हालचालीदेखील सुरूच ठेवल्या होत्या. ही अदलाबदल झालीच तर सुजय विखे काँग्रेसचे दक्षिणेतील उमेदवार असतील हे तर निश्चित; पण त्यांची लढत भाजपमध्ये नेमकी कुणाशी होईल हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

    दिलीप गांधी यांना महानगरपालिकेत आलेलं अपयश पाहता पक्ष त्यांच्या नावाचा पुन्हा विचार करेल का? असा प्रश्न जिल्ह्यातील राजकीय धुरिणांना पडलेला आहे. त्यामुळे गांधी यांच्या ऐवजी कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते? याची चाचपणी लोकांच्याच पातळीवर सध्या सुरू झालेली आहे. त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेऊन 'शेतकरी क्रांतिकारी पक्ष' या नावाने वेगळी राजकीय आस्थापना स्थापन करून नेवासा तालुक्यात दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेले माजी आमदार शंकरराव गडाख यांचे बंधू आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांच्या नावाची चर्चा देखील चांगलीच रंगते आहे. गडाख यांचे साम्राज्य असलेला नेवासा तालुका शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये असला तरी त्यांचे धागेदोरे दक्षिण लोकसभेशी जोडले गेले आहेत आहेत. त्यामुळे दिलीप गांधी यांना पर्याय म्हणून भाजपकडे प्रशांत गडाख यांचं नांव आवर्जून पोहोचवण्याचा काम गांधीविरोधी गटाने सुरू केलेलं आहे. तथापि, प्रशांत गडाख यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे किंवा नाही? याबाबतचं कोणताही स्पष्टीकरण अद्याप समोर आलेलं नाही. प्रशांत गडाख जर लोकसभेचे भाजपचे उमेदवार झाले; तर विधानसभेसाठी नेवासा मतदारसंघातून शंकरराव गडाख यांना भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या ऐवजी तिकीट मिळू शकते का? आणि तसं झालं तर विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढणार का? याचाही खल राजकीय पातळीवर सुरू झालेला आहे.

    या सर्व पार्श्वभूमीवर दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचा राजकीय विचार केला, तर परिस्थिती एकूणच राजकीय गुंतागुंतीची आहे हे मात्र खरं..! डॉ. सुजय विखे काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असले तरी दक्षिणेच्या सर्वच तालुक्यांमध्ये आपापले राजकीय गड सांभाळून असलेले गडाधिपती त्यांची उमेदवारी किती सहजतेने स्वीकारतील याबाबत साशंकता नक्कीच आहे. खा. दिलीप गांधी यांच्याबद्दल स्वपक्षीयांना मध्ये कितीही नाराजी असली तरी दक्षिणेतील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांचा कोणताही राजकीय उपद्रव काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला नाही. हीच त्यांची मोठी जमेची बाजू आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर दिलीप गांधी कोणत्याच राजकीय नेत्याच्या बलस्थाना मध्ये जाऊन ढवळाढवळ करीत नाहीत किंवा त्यांच्या कोणत्याही राजकीय महत्वकांक्षांच्या आड येत नाहीत. त्यामुळेच असा निरुपद्रवी खासदार दक्षिणेच्या राजकारणासाठी सोयीचा ठरतो. त्यामुळेच या मतदारसंघातून सलग तीन टर्म दिलीप गांधी खासदार आहेत हे उल्लेखनीय..! सुजय विखे काँग्रेसचे खासदार झालेच; तर दक्षिणेतील प्रत्येक आमदाराला आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना प्रत्येक निर्णयासाठी त्यांच्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. सर्व सूत्र प्रवरा येथून हलणार असल्याने आणि प्रवरेची राजकीय पोहोच मोठी असल्यामुळे त्याविरुद्ध काही बोलणं किंवा एखादी कृती करणं राजकीय दृष्ट्या नेत्यांना महागात पडू शकतं. त्यामुळे सर्वच विधानसभा मतदारसंघातील नेतेमंडळी आपल्या भविष्यातील राजकीय कारकिर्दीचा विचार, विखे पाटलांच्या बाबतीत नक्कीच करतील असा अंदाज आहे. पण जर भाजपा मधूनच दिलीप गांधी यांच्या उमेदवारीबाबत काही निर्णय घेण्यात आला तर मग मात्र प्रशांत गडाख यांच्या नावाला प्राधान्य दिले जाईल. कारण प्रवरेच्या विखे साम्राज्याविरुद्ध 'काॅंटे की टक्कर' घेण्यासाठी गडाख नावाचा ब्रँड सर्वानुमते दक्षिणेमध्ये पुढे करावा लागणार आहे. पण हे स्थानिक राजकारण भाजपचा किती अंगवळणी पडतं? यावरच पुढची सर्व गणिते अवलंबून राहणार आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटासाठी नामदेव राऊत इच्छुक आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादीकडून यावेळेला अजित पवार यांना रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्यामुळे ही लढत मोठी लक्षणीय होण्याची चिन्हे आहेत. ती टाळण्यासाठी म्हणून राम शिंदे यांना लोकसभेसाठी उतरवले जाईल, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. परंतु स्वतः राम शिंदे मात्र त्यासाठी इच्छुक नाहीत. परिस्थिती कितीही अवघड असली तरी आपण विजय संपादन करू, असा विश्वास त्यांना असल्यामुळे या विषयावर कोणतीही चर्चा करण्यास त्यांच्या गटातून नेहमीच नकार दिला जातो. 'थांबा-पहा-पुढे जा' असे धोरण राम शिंदे यांनी याबाबतीत अवलंबिले आहे.

    शिवसेना नेते घनश्याम शेलार यांनी मध्यंतरी 'दिलीप गांधींचा विजय हा नेहमीच प्रवरेच्या मदतीमुळे झालेला आहे', असा आक्षेप नोंदवला होता. त्यांचा हा दावा जर खरा असेल तर आता सुजय विखे यांच्या विरोधात दिलीप गांधी यांचं राजकारण कितपत यशस्वी होईल ही शंकाच आहे. उमेदवारी मिळाली तर हा दावा खोडून काढण्याचे मोठे आव्हान दिलीप गांधी यांच्यापुढे असणार आहे. दिलीप गांधी यांच्या विरोधात चर्चा कितीही असली तरी गेल्या पंधरा वर्षांमध्ये त्यांनी भाजपमध्ये आणि दिल्लीच्या राजकीय लॉबीमध्ये जोपासलेले हितसंबंध नेहमीच त्यांच्या कामी येतात आणि त्यातूनच अंतिम क्षणी त्यांची उमेदवारी जाहीर होते, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. एकदाच गांधी यांना डावलून प्रा.ना.स. फरांदे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. परंतु त्यात फरांदे यांचा पराभव होऊन राष्ट्रवादीचे उमेदवार तुकाराम गडाख विजय झाले होते. त्यामुळे गांधी यांचे तिकीट पक्षाकडून नाकारले गेले तर आणि तरच अन्य नावांचा विचार होऊ शकतो. त्यामुळे प्रशांत गडाख यांना लोकसभेची निवडणूक लढवायचीच असेल तर भाजपच्या बरोबरच अन्य राजकीय पर्यायांचा विचार सुद्धा आत्ताच करून ठेवावा लागणार आहे.

    नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती सध्या तरी अशीच गुंतागुंतीची आहे. राजकारणातला हा गुंता सोडवण्यात नगर जिल्हा चांगलाच माहीर आहे. फक्त तो कधी आणि केव्हा सोडवायचा? याची निश्चित वेळ यावी लागते एवढच..!! Ahmednagar Loksabhha Election

Post a Comment

 
Top