0

मनपात सत्ता स्थापनेसाठी भाजप, शिवसेनेने महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

 • नगर- मनपात सत्ता स्थापनेसाठी भाजप, शिवसेनेने महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून बाबासाहेब वाकळे, शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपत बारस्कर महापौरपदाच्या रिंगणात आहेत. उपमहापौरपदासाठी भाजपच्या मालन ढोणे, काँग्रेसच्या रुपाली वारे व गणेश कवडे रिंगणात आहेत. संख्याबळ जुळवण्यात कोण यशस्वी ठरणार हे शुक्रवारी (२८ डिसेंबर) निवडीच्यावेळी सभागृहातच स्पष्ट होईल. दरम्यान, सर्वच उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे.
  शिवसेनेला सर्वाधिक २४, राष्ट्रवादी १८, भाजप १४, काँग्रेस ५, बसप ४, २ अपक्ष, १ समाजवादी पक्ष असे बलाबल आहे. मनपाच्या ६८ नगरसेवकांपैकी ३५ चा आकडा गाठणाऱ्या पक्षाची किंवा गटाची सत्ता मनपात स्थापन होणार आहे. महापौर व उपमहापौरपदासाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक होणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी शेवटची मुदत होती. भाजप, शिवसेनेकडून महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीकडून महापौर, तर काँग्रेसकडून उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला.
  कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊनच सत्ता स्थापन करण्यात येईल. भाजप व शिवसेना युती झाल्यास बहुमताचा आकडा पार होईल, पण युतीचे कोडे शेवटपर्यंत उलगडलेले नाही. भाजप व शिवसेनेची युती फिस्कटल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या बाजूने मतदान करेल अशी अपेक्षा भाजपला आहे. परंतु राष्ट्रवादीने ऐनवेळी महापौरपदासाठी अर्ज दाखल केल्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जातो. पण राष्ट्रवादी काँग्रेस महापौर निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेणार की, संख्याबळ जुळवून धक्कादाक विजय मिळवणार हे पाहणे आैत्सुक्याचे ठरणार आहे. पण सध्यातरी भाजप व राष्ट्रवादी एकत्र येऊनच सत्ता स्थापन करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. जर असे झाले, तर शिवसेनेसमोर संख्याबळ जुळवण्याचे आव्हान असेल. शिवसेनेतील दोन जण पक्षाबरोबर नसल्याचे बोलले जात असले, तरी ऐनवेळी कोण कोणाला मदत करणार यावरच महापौर ठरणार आहे.
  भाजप व शिवसेना युतीबाबत थेट निवडीच्या दिवशीच झाला, तर राष्ट्रवादीला माघार घ्यावी लागेल. गुरुवारी युतीबाबत होणाऱ्या बैठकीचा निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे सध्यातरी युती होणार नसल्याचेच चित्र गृहित धरून सत्ता स्थापनेचे स्वतंत्र दावे राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेकडून केले जात आहेत. बसपचे तीन नगरसेवक भाजपबरोबर, तर एक शिवसेनेबरोबर असल्याची चर्चा आहे.
  छिंदमचे मत कोणाला?
  बेताल वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरलेला श्रीपाद छिंदम बंदोबस्तात महापौर निवडीसाठी सभागृहात उपस्थित राहणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व असल्याने श्रीपाद छिंदमचे मत कोणाला अशीही चर्चा रंगली आहे. दरम्यान, छिंदमने मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
  असे केले अर्ज दाखल
  पदाधिकारी व नगरसेवकांच्या लवाजम्यासह उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजपचे बाबासाहेब वाकळे यांच्या महापौरपदाच्या अर्जावर सूचक रवींद्र बारस्कर, तर अनुमोदक वंदना ताठे आहेत. राष्ट्रवादीच्या संपत बारस्कर यांच्या अर्जासाठी सूचक समद खान, तर अनुमोदक शोभा बोरकर. शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना सूचक पुष्पा बोरुडे, तर अनुमोदक अनिल शिंदे आहेत. उपमहापौरपदासाठी भाजपच्या मालन ढोणे यांना सोनाली चितळे सूचक, तर सोनाबाई शिंदे अनुमोदक आहेत. सेनेचे गणेश कवडे यांना सूचक अशोक बडे आहेत.
  Who is the Mayor? Decide today

Post a Comment

 
Top