0
राज्यात सर्वत्र दुष्काळ आहे. याची राज्य शासनानेही दखल घेतली आहे. पण दुष्काळावर उपाययोजना तातडीने केल्या जात नाहीत. त्यामुळे  जिल्हय़ातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी तातडीने सर्व खासदार, आमदारांच्या उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सभेत घेण्यात आला. या सभेला सर्व विभागाचे अधिकारी बोलावून घेऊन यावर तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्याचा ठराव करण्यात आला. दुष्काळाबाबत फक्त कागदी घोडे नाचविण्यापेक्षा ठोस निर्णय घेण्यासाठी ही सभा घेण्याची मागणी सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी लावून धरली. त्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी साथ देत ही सभा लवकरच बोलावून उपाययोजना केल्या जातील, असे आदेश दिले.
 जिल्हय़ातील एक सर्वसाधारण सभा ही मुख्यालयाव्यतिरिक्त जिल्हय़ात कोठेही घेता येते त्यानुसार ती सभा खानापूर तालुक्यातील विटा  येथील जय मातादी मंगल कार्यालयातील माजी आमदार कै. संपतराव माने सभागृहात अध्यक्ष 
संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेचे संयोजन जिल्हा परिषदेचे  उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले होते. यावेळी सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी, ब्रह्मानंद पडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
जिह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. या तालुक्यात शासनाकडून दुष्काळ जाहीर झाला आहे पण याव्यतिरिक्त अन्य तालुक्यातील काही गावातही पावसाने दडी मारल्याने खरीपासोबत रब्बी हंगाम संकटात आला, रब्बीची पेरणीचे अनेक गावात झाली नाही. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या चाऱयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे टँकरची मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर टंचाईचे उपाय तातडीने होण्याची गरज होती पण ती होत नाही त्यामुळे जिल्हापरिषद सदस्यांनी आक्रमकमपणे आपल्या भावना यावेळी मांडल्या.
दुष्काळासाठी संयुक्त सभा घ्या : डी.के.पाटील
जिह्यातील बहुतांशी भागाला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. आपण फक्त दुष्काळ निवारण्यासाठी ठराव करतो. पण, त्यावर उपाय होत नाही. यावर पूर्णपणे उपाय योजना करण्यासाठी आमदार-खासदाराच्या उपस्थितीत स्वतंत्र सभा  बोलवावी, अशी मागणी  डी. के. पाटील यांनी केली. दुष्काळी उपाययोजनांची प्रत्यक्षात कार्यवाही झाली पाहिजे. त्यामध्ये चुका नकोत. प्रत्येक सदस्याला त्यांच्यापुढे प्रश्न मांडता आले पाहिजेत. त्यामुळे अध्यक्षांनी दुष्काळी प्रश्नावर तात्काळ विशेष सभा बोलावावी.
उपाय योजनेत दुजाभाव नको : सत्यजित देशमुख
सध्या दुष्काळ जाहीर करण्यासाठी सर्कलनिहाय पाऊस बघितला जातो. काही वेळा सर्कलमध्ये मोठा पाऊस होतो. पण, या सर्कलमध्ये असणाऱया अनेक गावात पावसाचा टिपूसही नसतो. त्यामुळे या टिपूस नसलेल्या गावांच्यावर अन्याय होतो. हा अन्याय दूर करण्यासाठी दुजाभाव नको असे जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख यांनी सांगितले. पश्चिम भागातील अनेक गावांना या सर्कलच्या पर्जन्यमान तपासणीमुळे त्रास होत आहे. अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागत असला, तरी उपाययोजना राबविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. टंचाई अथवा दुष्काळासाठी गावनिहाय पर्जन्यमापन बघण्याची गरज आहे. दुष्काळाच्या उपाय योजना राबवण्यासाठी वेळ पडली तर जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत एकादी बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पाण्याचा प्रश्न गंभीर असताना महसूल विभाग टँकर देत नाही. दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामसेवकांना टँकरचे अधिकार द्यावेत, अशी मागणी सदस्य प्रमोद शेंडगे यांनी केली. तहसीलदार प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात टँकरच्या प्रस्ताव थांबतात, त्यामुळे याबाबतचा विचार करण्याची गरज आहे. चारा आणि पाणी प्रश्नाबाबत तालुकास्तरावर बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली.
जतच्या तोंडचे पाणी पळवले : सरदार पाटील
जतमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना याठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने दिलेले टँकर आटपाडी तालुक्यात पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आटपाडी तालुक्याने जतचे तोंडचे पाणी पळविले आहे, असा आरोप सदस्य सरदार पाटील यांनी केला. जतसारखाच दुष्काळ आटपाडीला आहे, हे मान्य परंतु जतचे टँकर देऊन आमच्यावर अन्याय का करता असा सवालही त्यांनी यावेळी केला. दुष्काळाबाबत जतकडे गंभीरपणे लक्ष द्या अशी मागणी त्यांनी केली.
पीक विम्याचे निकष बदला
जिह्यात नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर द्राक्षे पिकासह इतर फळ पिकांचे नुकसान झाले आहे. फळ पीक विमा योजनेमध्ये असलेले ऑक्टोबरपासून ठराविक महिन्यातच भरपाई मिळते. मात्र तसे न करता ती मुदत वर्षभर असावी. त्याच बरोबर गावनिहाय पर्जन्यमान केंद्र बसवून त्याचा वापर भरपाई साठी देण्यासाठी व्हावा, अशी मागणी सदस्य चंद्रकांत पाटील, अर्जुन पाटील  यांनी केली. या मागणीला डी. के. पाटील, सत्यजित देशमुख, संजीव पाटील यांनी पाठिंबा दिला.

Post a Comment

 
Top