0
हिवाळी अधिवेशन संसदेवरील हल्ल्याच्या स्मृतिदिनीही कामकाज ठप्प

नवी दिल्ली - संसदेवरील हल्ल्याच्या स्मृतिदिनीही दोन्ही सभागृहांत कामकाज झाले नाही. हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी विरोधकांनी रफाल विमान करार, अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम आणि कावेरी पाणी वाद प्रकरणात सरकारला घेरले. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करावे लागले. राज्यसभेत अद्रमुक आणि द्रमुकचे खासदार हौद्यापर्यंत पोहोचले. त्यांनी कावेरी नदीमुळे प्रभावित लोकांचे पुनर्वसन करावे, अशा घोषणा दिल्या. या खासदारांनी सभागृहात फलक झळकावले. तेलुगू देसमने आंध्रला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली. त्यावर राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी खासदारांना हात जोडले आणि विनंती केली की, संसद आणि खासदारांचे संरक्षण करताना नऊ जण हुतात्मा झाले होते. किमान आज (हल्ल्याचा स्मृतिदिन) तरी सभागृहाचे कामकाज सुरू ठेवा, अन्यथा चुकीचा संदेश जाईल. दुसरीकडे भाजपला हिंदुत्वाचा विसर पडल्याचा आरोप शिवसेनेने केला.

संसदेबाहेर : पूरग्रस्त केरळसाठी मदतीची मागणी
संसद भवन परिसरात डाव्या पक्षांव्यतिरिक्त टीडीपी व अण्णाद्रमुकच्या खासदारांनी गुरूवारी ठिय्या केला. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर त्यांनी आंदोलन केले. केरळला नुकसान भरपाई देण्याची मागणी डाव्या पक्षांनी केली. केंद्र सरकारने केरळला विशेष आर्थिक पॅकेज दिले पाहिजे. टीडीपीने सभागृहाबाहेरही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी लावून धरली होती. कावेरी नदीमुळे पीडित लोकांच्या हक्कांच्या संरक्षणाचीही मागणी त्यांनी केली.

टीडीपी खासदारांनी हौद्यात येऊन माईक हस्तगत केला
लोकसभेत प्रश्नोत्तरांदरम्यान काँग्रेस, टीडीपी व अण्णाद्रमुकचे खासदार हौद्यात उतरले. टीडीपीचे खासदार व्यंकटेश राव (बाबू) हौद्यात उतरुन माइकवरुन म्हणाले, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा. या माईकवर नवीन खासदारांचा शपथ समारंभ घेतला जातो. संसदीय व्यवहार मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राव यांना माइक वापरण्यास रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु राव यांनी त्यांना जुमानले नाही. शिवसेनेच्या सदस्यांनी राम मंदिर मुद्दा मांडला. खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपशी युती केली. पण आता त्यांना विसर पडला आहे.News about Parliament work

Post a comment

 
Top