0
3 राज्यांतील काँग्रेसच्या विजयात युवकांचा 'हात'; महाराष्ट्रात अाम्ही 10 लाख युवकांपर्यंत पाेहाेचणार

नाशिक - काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून राहुल गांधी यांना मिळालेला हा सर्वात मोठा विजय आहे. युवक काँग्रेसच्या संघटनेतून आपल्या राजकारणाची सुरुवात करणाऱ्या राहुल यांच्या या यशात युवक काँग्रेसचाही महत्त्वाचा वाटा अाहे. या पाचही राज्यांतील बेरोजगार युवकांशी काँग्रेसने साधलेला थेट संपर्क, नवमतदारांशी आकांक्षा समजून घेण्याचा कल, जुने जाणते आणि नवे उमदे यांच्यात समन्वय घडवून आणण्यात राहुल गांधींना आलेले यश आणि भाजपच्या तोडीस तोड उत्तरे देणारी पक्षाच्या सोशल मीडियाची आघाडी ही काँग्रेसच्या यशाची त्रिसूत्री असल्याचे मत युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील सदस्य असलेल्या तांबे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात १५ डिसेंबरपासून 'चलो पंचायत' अभियान सुरू हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी 'दिव्य मराठी'शी साधलेला संवाद...

३ राज्यांतील काँग्रेसच्या विजयात युवकांचा 'हात'; महाराष्ट्रात अाम्ही १० लाख युवकांपर्यंत पाेहाेचणार 
प्रश्न : युवक काँग्रेसच्या नजरेतून या यशाचे गमक काय? 
सत्यजित तांबे : पाच राज्यांतील निकालाचे विश्लेषण केले तर स्पष्टपणे दिसते ते जुनेजाणते आणि नवे उमदे यांच्यात समन्वय घडवून आणण्यात राहुल गांधींना आलेले यश. काँग्रेसबद्दल एक नेहमी बोलले जाते की काँग्रेसच काँग्रेसचा पराभव करते. या वेळीही राजस्थानात सचिन पायलट आणि अशोक गेहलोत, मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबत टोकाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु ज्येष्ठ व तरुणांत समन्वय घडवून आणण्यासाठी राहुल गांधींनी वैयक्तिक लक्ष घातले. त्याचे हे फळ आहे. मध्य प्रदेशात कुणाल चौधरी, छत्तीसगडमध्ये उमेश पटेल आणि राजस्थानात अशोक चंदन हे युवक काँग्रेसचे तीन प्रदेशाध्यक्ष विजयी झाले आहेत.


प्रश्न : आपण अहमदनगरसारख्या शेतीप्रधान जिल्ह्यातून येता, शेतकरी मते या निवडणुकीत निर्णायक ठरली? 
तांबे : निश्चितच. संपूर्ण देशातील शेतकरी सरकारवर प्रचंड नाराज आहे. त्याला निसर्ग साथ नाही आणि सरकारही पाठीशी नाही, अशी त्याची भावना आहे. मोदींनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. उलट नोटबंदीसारख्या चुकीच्या निर्णयाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला, हा केंद्र सरकारचाच अहवाल आहे. काँग्रेसने मात्र पंजाब आणि कर्नाटकमध्ये सत्तेवर आल्यावर १० दिवसांत कर्जमाफीचे अाश्वासन पाळले. त्यामुळे शेतकऱ्यांत काँग्रेसबद्दल विश्वास निर्माण झाला. दिल्लीत झालेल्या किसान मुक्ती मोर्चात राहुल गांधी सहभागी झाले, पंतप्रधान मोदी मात्र प्रियंका चोप्राच्या रिसेप्शनला गेले, हे शेतकरी बघत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती तर अधिकच बिकट आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुण शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.

प्रश्न : दुसरा कोणता घटक निर्णायक ठरला? 
तांबे : तरुण. मोदी सरकारच्या काळात देशातील बेरोजगारीचा प्रश्नही अत्यंत गंभीर बनला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या सर्व राज्यांत युवक काँग्रेसने बेरोजगार युवकांना थेट जोडण्याचे काम केले. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन बेरोजगार युवकांची नोंदणी केली, त्यांचे प्रश्न आणि अपेक्षा समजून घेतली. काँग्रेस सत्तेत असताना रोजगार निर्मिती कशी केली होती आणि पुन्हा सत्तेत आली तर त्यांच्या रोजगारासाठी काय मदत करू शकते याबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. यातून राजस्थानात अडीच लाख, मध्य प्रदेशात साडेतीन लाख, तेलंगणात दीड लाख बेरोजगार तरुण जोडले गेले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस काही महिन्यांत १० लाख बेरोजगारांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न समजून घेणार आहे.

प्रश्न : याशिवाय युवक काँग्रेसचा काय कार्यक्रम आहे? 
तांबे : येत्या १५ डिसेंबरपासून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस 'चलो पंचायत' अभियान सुरू करत आहे. यात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाणार आहेत. त्यांना मी पंचसूत्री कार्यक्रम दिला आहे. एक - गावातील बेरोजगार युवकांशी संपर्क साधणे, दोन - शेतकऱ्यांशी बोलणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे, तीन - गावातील स्थानिक समस्या, दुष्काळाची परिस्थिती समजून घेणे,चार - भाजपने २०१४ च्या निवडणुकीत दिलेल्या १० अाश्वासनांची वास्तविकता तपासणे आणि पाच- त्या गावात युवक काँग्रेसची शाखा सुरू करणे.

प्रश्न : हे सर्व २०१९ च्या निवडणुकीची दिशा ठरवेल का? 
तांबे : अर्थातच, किंबहुना देशातील जनतेनेच ती दिशा ठरवली आहे. हे निकाल हिंदी भाषिक राज्यातील आहेत, जिथल्या मतदारांनी पूर्वी भाजपच्या बाजूने मोठा कौल दिला होता तो विकासाच्या मुद्द्यावर. पण भाजपने नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा काढला. अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले, लोकांच्या भावनांचे राजकारण केले. मात्र भावनेचे राजकारण करू नये हे जनतेने दाखवून दिले आहे. नवमतदारांना विकासाचे, रोजगारचे मुद्दे सोडून मॉब लिंचिंग, बीफ बंदी, नाव बदलणे यात इंटरेस्ट नाही. या पिढीला त्यांच्याशी थेट बोलणारा राहुल गांधींसारखा नेता पटतोय.

प्रश्न : नेते म्हणून राहुल गांधींसाठी ही निवडणूक कशी वेगळी होती? 
तांबे : एक सिरियस लीडर म्हणून, प्रामाणिक नेता म्हणून देशातील जनतेने राहुल गांधींना स्वीकारले आहे. खरे तर ते मुळातच सिरियस नेते आहेत, पण गेल्या निवडणुकीत भाजपने खोट्या प्रचाराने त्यांची चुकीची प्रतिमा निर्माण केली होती. आता काँग्रेसने भाजपच्या सोशल मीडियावरील माेहिमांना ताेडीस तोड उत्तरे दिली आहेत. त्यातून राहुल गांधींची चुकीची प्रतिमा सुधारण्यास काँग्रेसला मदत झाली आहे. दुसरीकडे रफाल घोटाळा, 'अच्छे दिन' चे गाजर, १० लाख कोटींचे कर्ज बडवून उद्योगपतींनी केलेले पलायन आणि २०१४ ला दिलेली अाश्वासने न पाळल्याने मोदींच्या प्रतिमेस तडा गेला आहे.

Post a comment

 
Top