0
मागील आठ दिवसांतील घटनांवरून पोलिसांचा इशारा

औरंगाबाद- तुमच्या घरातील लग्न सोहळ्यात भरजरी कपडे घालून येणारे तरुण, अल्पवयीन मुले वधू किंवा वराकडील पाहुणेच असतील, असे नाही. कारण चांगली वेशभूषा करून पाहुण्यांसारखे येत वधू-वरांचे दागिने, रोख रकमेवर नजर ठेवून ती लंपास करणारी टोळी शहरात कार्यरत आहे. मागील आठ दिवसांत नऊ समारंभांतून सुमारे ५० लाख रुपयांचा ऐवज या टोळीने लंपास केला आहे. विशेष म्हणजे एकाही प्रकरणात पोलिसांना कुठलाही पुरावा सापडला नाही. अजून सहा महिने लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे वऱ्हाडी म्हणून मिरवणाऱ्या या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
मुलीसाठी घेतलेले मौल्यवान दागिने, पैसे काही क्षणांतच गायब होत असल्याने वधुपित्याच्या पायाखालची जमीन सरकत आहे. गेल्या ३ डिसेंबर रोजी व्यावसायिक जबिंदा यांच्या मुलीच्या लग्नात २९ तोळ्यांचे दागिने चोरीला गेले होते. विशेष म्हणजे या सोहळ्यात शहरातील बडे पोलिस अधिकारी आणि व्हीआयपी हजर असताना हा प्रकार घडला हाेता. कम्युनिटी पोलिसिंगमध्ये व्यग्र असलेल्या पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज असतानादेखील चोरट्यांचा माग काढता आला नाही, हे विशेष. गुन्हे शाखेलादेखील आरोपींना पकडण्यात यश आले नाही. सातारा, मुकुंदवाडी, सिडको, एमआयडीसी सिडको आणि जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंगल कार्यालयांत चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत.
२०१४ मध्ये अटक केली होती टोळी
२०१४ मध्ये गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या पथकाने लग्नात चोरी करणारी टोळी गजाआड केली होती. या टोळीत लहान मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. चांगले कपडे घालून ही टोळी लहान मुलांना घेऊन लग्न समारंभात सहभागी होत असे. वधू आणि वर पक्षातील आई-वडील आणि ऐवज सांभाळणाऱ्यांवर लक्ष ठेवून संधी मिळताच चोरी करून फरार होत असे. अटकेनंतर काही दिवसांनी टोळीतील चोरट्यांची जामिनावर सुटका झाली होती. या टोळीत महिला आणि मुलींचादेखील सहभाग होता. शहरातील टोळीबरोबरच आंतरजिल्हा आणि परराज्यातील टोळी अशा चोऱ्या करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. मधल्या तीन वर्षांत अशा चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, पुन्हा धुमाकूळ घातला आहे.
शहरातील वेगवेगळ्या नऊ समारंभांतून ५० लाखांचा ऐवज चोरी
२७ नोव्हेंबर : आतेभावाच्या लग्नात आलेल्या महिलेच्या पर्समधून २९ हजार रुपयांचे दागिने व काही रोख रक्कम चोरीला गेली. सिडको ठाण्यात गुन्हा दाखल.
३ डिसेंबर : बीड बायपासवरील जबिंदा लॉन्सवर बांधकाम व्यावसायिकाच्या मुलीच्या लग्नातून वधूसाठी खरेदी केलेले जवळपास २९ तोळे सोने चोरट्यांनी हातोहात लंपास केले. सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
२२ डिसेंबर : पाटीदार भवन येथील लग्नातून वरमुलाच्या आईची सव्वा लाख रुपये रोख व मोबाइल असलेली पर्स चोरांनी लांबवली. जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
२३ डिसेंबर : मुकुंदवाडी येथील ईडन गार्डन येथील लग्न समारंभात भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक महेश खडतरे यांचा ८५ हजार रुपये किमतीचा मोबाइल चाेराने लांबवला. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
२३ डिसेंबर : ईडन गार्डनमध्ये ५३ वर्षीय महिलेची पर्स लंपास. त्यात सॅमसंग मोबाइल व ५ हजार रुपये रोख रक्कम होती. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
२३ डिसेंबर : बीड बायपास येथील रिगल लॉनमध्ये व्यावसायिक कैलास गंगाराम चाटसे यांच्या कुटुंबातील लग्नात नातेवाईक छायाचित्र काढण्यात मग्न असताना चोरट्यांनी मुलीच्या आईची १ लाख ६४ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरून नेली.
२६ डिसेंबर : सिडकोतील सप्तपदी व सौभाग्य मंगल कार्यालयात एकाच्या पँटच्या मागील खिशातील चार हजार रुपये रोख असलेले पाकीट चोरी. तसेच ३० वर्षीय महिलेची पर्स पळवली. सोन्याचे कानातले व ४ हजार रुपये रोख रक्कम काढून घेत तेथेच पर्स फेकून दिली. सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
२५ डिसेंबर : गुरू लॉन्स येथे पार पडलेल्या समारंभातून रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४२ तोळे सोन्याचे दागिने व सव्वा लाख रोख रक्कम असलेली पर्स चोरून नेली.
मंगल कार्यालयांत सीसीटीव्ही बसवा
घडलेल्या घटना गंभीर आहेत. मात्र, मंगल कार्यालयांच्या मालकांनीही काळजी घ्यावी. उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही बसवावेत. शिवाय गेटवर सुरक्षा रक्षक तैनात करावेत. एका मंगल
कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळाले असून त्याआधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. - डॉ. नागनाथ कोडे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.Police alert in Aurangabad

Post a Comment

 
Top