0
धडक होऊन रस्त्यावर खाली पडताच ट्रकचे पुढचे चाक तरुणाच्या डोक्यावरुन गेले.

जळगाव- लग्नासाठी घरी आलेले नातेवाईक व वडील रिक्षेने रेल्वेस्थानकावर जात असताना त्यांच्या सोबतच दुचाकीने घरुन निघालेल्या तरुण मुलाला पाठीमागून ट्रकने जोरदार धडक दिली. यात तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ३.४५ वाजता हाॅटेल रॉयल पॅलेससमोर हा अपघात झाला. दरम्यान, मृत्यूनंतर कुटुंबबियांच्या इच्छेने तरुणाचे नेत्रदान करण्यात आले. या अपघातानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता. वडीलांच्या डोळ्यादेखत हा अपघात झाला.

शुभम विनोद मिस्त्री (वय २२, रा. कलेक्टर बंगल्याच्या मागे, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर रामानंद अनिल साळुंखे (वय २१, रा. बांभाेरी) या ट्रकचालकाने शुभमच्या दुचाकीस धडक दिली. शुभमच्या चुलत बहिणेच लग्न शुक्रवारी झाले. या लग्नासाठी शुभमचे मामा, मामीसह इतर नातेवाईक पुण्याहून जळगावी आले होते. लग्नसमारंभ आटाेपल्यानंतर शनिवारी दुपारी त्याचे मामा गणेश शंकर साेमवंशी (वय ४०, रा. विश्रांतवाडी, देवकर कॉलनी, पुणे) हे कुटुंबियांसह पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. सोमवंशी कुटुंबिय व शुभमचे वडील रिक्षेत बसले होते. तर त्यांच्या सोबतच शुभम हा देखील रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी दुचाकीने (एमएच १९ बीएल ८६८३) निघाला. हॉटेल रॉयल पॅलेस समोरुन जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (एमएच ०८ एच १५३६) शुभमच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या धडकेमुळे शुभमच रस्त्यावर पडताच ट्रकचे पुढचे चाक त्याच्या डोक्यावरुन गेले. यात जागेवरच त्याचा मृत्यू झाला. मागे रिक्षेत असलेले त्याचे वडील विनोद मिस्त्री व मामा गणेश सोमवंशी यांच्या डोळ्यादेखत हा अपघात झाल्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळी न थांबता पळ काढला. त्याने सागरपार्ककडून डावीकडे वळण घेऊन एका गल्लीत चारचाकी लपवून ठेवली. यानंतर तो स्वत:हून रामानंदनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. तर घटनास्थळी शुभमचे वडील, मामा यांनी स्वत:ला सावरत रस्त्यावरील इतर नागरिकांच्या मदतीने शुभमचा मृतदेह उचलून एका वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरताच शुभमचे मित्र आणि नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी गणेश सोमवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रकचालक साळुंखे याला अटक करण्यात आली. पाेलिस उपनिरीक्षक कांचन काळे पुढील तपास करीत आहेत.

शुभम एकुलता मुलगा :
शुभमच्या चुलत बहिणीचे लग्न शुक्रवारीच झाले होते. त्यामुळे मिस्त्री कुटुंबीयांकडे पाहुण्यांची गर्दी होती. घरी उत्साहाचे वातावरण होते. अशातच शुभमचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे सर्वच नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली. शुभम हा मिस्त्री दाम्पत्याचा एकुलता मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील व एक लहान बहिण असा परिवार आहे. शुभमचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. वडीलांसह नातेवाईकांनी एकत्रितपणे चर्चा करुन शुभमचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेऊन प्रक्रीया पूर्ण केली. ़

वडिलांचा पोलिस ठाण्यात आक्रोश
डोळ्यादेखत मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर विनोद मिस्त्री यांना प्रचंड धक्का बसला. त्यातून सावरत त्यांनी नातेवाइकांसह रामानंदनगर पोलिस ठाणे गाठले. दोषी असलेल्या ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. रात्री ७ वाजता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया पूर्ण झाली. तोपर्यंत घटनेची हकीकत सांगत असताना त्यांनी प्रचंड आक्रोश केला. सोबत असलेल्या नातेवाईकांनी त्यांना धीर दिला.

मित्रांचा संताप, पोलिस ठाण्यात तणाव
शुभम हा मू.जे. महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. अपघाताची बातमी त्याच्या मित्रांपर्यंत पोहचताच त्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली. ट्रकचालकास आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करीत त्यांनी संताप व्यक्त केला. या मुळे पोलिस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड, शहर पोलिस ठाण्याचे एकनाथ पडाळे यांनी क्युआरटी पथक पाचारण करुन पोलिस ठाणे गाठून गर्दीवर नियंत्रण मिळवले. यानंतर पोलिस बंदोस्तात ट्रकचालक साळुंखे यास जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कोठडीत आणण्यात आले.Bike accident in Jalgoan

Post a comment

 
Top